मुंबई, 27 डिसेंबर : शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मुंढे यांची आता राज्य एड्स नियंत्रण सोसायटीमध्ये बदली करण्यात आली आहे. इथं ते प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांची 22 नोव्हेंबर रोजी बदली झाली होती. त्यांची नियुक्ती नियोजन विभागात करण्यात आली होती. नियोजन विभागात ते सहसचिव म्हणून काम करणार होते. परंतु, तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांची पुन्हा एकदा बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंढे यांची थेट राज्य एड्स नियंत्रण सोसायटीमध्ये बदली करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम मुंढे नियोजन विभागातील वरिष्ठांना नको होते. त्यांना रुजू करुन घेण्यास नकारच दिला होता. त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारला नव्हता. 12 वर्षांत 12 ठिकाणी बदल्या आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळं तुकाराम मुंढे फार काळ कुठेच टिकले नाहीत. 2005 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. प्रोबेशननंतर 2006 मध्ये त्यांनी सोलापूरचे आयुक्त म्हणून कामाला सुरूवात केली. गेल्या 12 वर्षात त्यांच्या तब्बल 12 वेळा बदल्या झाल्या आहेत. धडाकेबाज काम, हट्टी स्वभाव आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवण्याची वृत्ती. यामुळं त्यांचा लोकप्रतिनिधींशी कायम संघर्ष होत आला आहे. वर्ष-दीड वर्षांपेक्षा जास्त काळ ते कुठेच टिकले नाहीत. मात्र, या प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. ते जिथे जातील तिथे कर्मचाऱ्यांना शिस्त लावतात. गैरव्यवहार मोडून काढतात.लोकप्रतिनिधींची मनमानी बंद करतात. त्यामुळं त्यांची वारंवार भांडणं झाली. त्यांच्याविरूद्ध अनेक ठिकाणी आंदोलनंही झाली. नाशिकमध्ये आयुक्त होते, तेव्हा नगरसेवकांविरुद्धच्या वादात एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती. मात्र, काही महिने वगळता शांतता फार काळ राहिली नाही. आपल्या स्वभावाला मुरड घाला असं त्यांना अनेकदा सांगण्यात आलं होतं. मात्र, मुंढेंनी कधीच आपला स्वभाव बदलला नाही. त्यामुळे त्यांची बदली थेट मंत्रालयात करण्यात आली होती. परंतु, इथंही मुंढे यांनी पदभार स्वीकारलाच नाही. अखेर त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची कारकीर्द 2006-07 - महापालिका आयुक्त, सोलापूर 2007 - प्रकल्प अधिकारी, धारणी 2008 - उपजिल्हाधिकारी, नांदेड 2008 - सीईओ, नागपूर जिल्हा परिषद 2009 - अति. आदिवासी आयुक्त, नाशिक 2010 - के. व्ही. आय. सी. मुंबई 2011 - जिल्हाधिकारी, जालना 2011-12 - जिल्हाधिकारी, सोलापूर 2012 - विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई 2016 - महापालिका आयुक्त, नवी मुंबई 2017 - पिंपरी-चिंचवड परिवहन, पुणे 2018 - महापालिका आयुक्त, नाशिक 2018 - नियोजन विभाग, मंत्रालय 2018 - महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी ===========================