मुंबई, 22 सप्टेंबर : भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरुच आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) ईडीचा इतका अनुभव कधीपासून? असा सवाल विचारला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र लिहून त्याला उत्तर दिलं. यानंतर संजय राऊत यांनी सामनाच्या संपादकीयमध्ये (Saamana editorial) हे पत्र जसेच्या तसे छापले. इतकेच नाही तर संजय राऊत यांनी आक्रमक होत चंद्रकांत पाटील यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांच्या पत्रावर भाष्य करताना म्हटलं, चंद्रकांत पाटील यांनी पीएमसी घोटाळ्याच्या संदर्भात जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत त्याच्या संदर्भात पुढील चार दिवसांत चंद्रकांत पाटील यांना माझी कायदेशीर नोटीस जाईल. अब्रुनुकसानीचा दावा तर आहेच. हा कसला आरोप आहे, आम्ही असे धंदे करत नाहीत. त्यांना संपूर्ण कायदेशीर कारवाईला जावं लागेल. लोकं 100 कोटी रुपयांचा दावा, 50 कोटी रुपयांचा दावा दाखल करतात. मी चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार. OBC राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाच्या मुद्द्यावरुन राज्यपाल आणि मविआ सरकार पुन्हा आमने-सामने? चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलं होतं पत्रात? तुम्ही अग्रलेखात लिहिले की, “भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल. पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला?” संजयराव तुमचा प्रश्न रास्त आहे. मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करुन, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरुन मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर 127 कोटींसाठी नक्कीच फेस येणार. असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला, पण मला ईडीचा अनुभव नाही हे मात्र खरेच आहे. चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लिहिलेल्या पत्रात हे म्हटलेलं आहे आणि आजच्या सामनाच्या अग्रलेखात हे पत्र जसेच्या तसे छापण्यात आलेले आहे. मंगळवारच्या अग्रलेखात चंद्रकांत पाटलांना राऊतांचा सवाल सामनाच्या मंगळवारच्या अग्रलेखात म्हटले होते की, ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या खिशातच आहेत व त्यांच्या जोरावर आपण राजकीय विरोधकांना धमक्या देऊ शकतो, असे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटत आहे आणि तसे धमकीसत्र त्यांनी चालवले आहेच. काही झाले की, हे लोक फक्त ईडी, सीबीआयच्या नावाने धमक्या देतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरच्या हसन मुश्रीफ यांनाही धमकावले आहे की, ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल. पाटील यांना ईडीचा इतका अनुभव कधीपासून आला? असा सवाल सामनातून विचारण्यात आला होता. चंद्रकांत पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता हसन मुश्रीफ हे मंत्री आहेत आणि कोल्हापुरात त्यांचे राजकीय वजन आहे. कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला आणि चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळवताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता असं म्हणत शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं.