पणजी, 30 जून : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर आज पूर्णविराम मिळताना दिसत आहे. कारण महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळलं असून शिवसनेचे बंडखोर आमदार (Shiv Sena Rebel MLAs) आणि भाजप (BJP) यांच्या युतीचं सरकार स्थापन होणार आहे. बंडखोर नेत्यांचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज गोव्यातून मुंबईत दाखल झाले. त्यांनी फडणवीसांसोबत आज राजभवनावर जावून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. त्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली. या घोषणेनंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण ठाकरे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज बांधला जात होता. पण फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. एकनाथ शिंदे यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर तिकडे गोव्यातील ताज हॉटेलमध्ये थांबलेले शिवसेनेचे इतर बंडखोर नेते यांचा आनंदाचा पारा राहिला नाही. त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रचंड जल्लोष केला. शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आनंद गगनात राहिला नाही. आमदार अक्षरश: टेबलवर चढून नाचत होते. हे सर्व नेते ‘नाथांचा नाथ एकनाथ’ या गाण्यावर नाचताना दिसले. त्यांच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ आता समोर देखील आले आहेत.
( मुख्यमंत्री शिवसेनेचाच! भाजपच्या खेळीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर ) दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आजच्या पत्रकर परिषदेत देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. “आजच्या काळात ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकसुद्धा अशाप्रकारचा निर्णय घेताना दिसत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर 50 लोक एकत्र येतात. मला काय, मी नगरविकास मंत्री होतो. माझ्या काय अडचणी होत्या ते बाजूला जाऊद्या. पण जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न आणि समस्या त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही तीन-चार वेळा मुख्यमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. अखेर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. राज्याच्या हितासाठी आम्ही हा निर्णय घेतला. आज या निर्णयाबरोबर देवेंद्र फडणवीसांनी जो निर्णय घेतला, 120 चं संख्याबळ त्यांच्याकडे आहे. मुख्यमंत्रीपद तेही घेऊ शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठापण दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला, त्यांच्या मोठेपणाबद्दल त्यांचे, पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.