मुंबई 7 नोव्हेंबर: विधान परिषदेवर (MLC) राज्यपाल नियुक्त जागेंसाठी महाविकास आघाडीने राज्यपालांना 12 नावे दिली आहेत. त्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचं (Urmila Matondkar ) नाव आहे. शिवसेनेने (Shivsena) त्यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवलेल्या उर्मिला यांनी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी उर्मिला मातोंडकरांना उमेदवारी देण्याचं कारण सांगितलं आहे. त्यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झाल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकरांना फोन करून उमेदवारी बद्दल विचारणा केली. त्यानंतर त्यांनी उमेदवारी स्वीकारल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उर्मिला यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मात्र त्यानंतरही परिषदेसाठी काँग्रेसने त्यांना विचारणा केली होती. मात्र आपण राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगत त्यांनी ऑफर नाकारली असं काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं. कोरोनाच्या भीतीमुळे या अभिनेत्रीने सोडला होता देश, 6 महिन्यांनी परतली भारतात संजय राऊत म्हणाले, उर्मिता मातोंडकरांसारखी सडेतोड बोलणारी, देशाची आणि महाराष्ट्राची जाण असलेली, सामाजिक बांधिलकी जपणारी व्यक्ती जर विधान परिषदेत असेल तर ते महाराष्ट्रासाठी फायद्याचं होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यामुळेच उर्मिला मातोंडकरांना उमेदवारी देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यपाल हे सुज्ञ आहेत. आमचं त्यांच्यावर आणि त्यांचं आमच्यावरचं प्रेम जगाला माहित आहे. त्यामुळे कुठलाही वाद निर्माण होणार नाही याची काळजी घेतील असा टोलाही त्यांनी लगावला.