JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'नातेवाईक आणि मित्रांपासून दूर राहा', आमदारांना कानमंत्र, शिवसेनेच्या 'सह्याद्री'वरील बैठकीची Inside Story

'नातेवाईक आणि मित्रांपासून दूर राहा', आमदारांना कानमंत्र, शिवसेनेच्या 'सह्याद्री'वरील बैठकीची Inside Story

शिवसेनेचे सर्व आमदार आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. या सर्व आमदारांची राहण्याची सोय पवई येथील वेस्टिन हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जून : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येत पक्षाच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे सर्व आमदार आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. या सर्व आमदारांची राहण्याची सोय पवई येथील वेस्टिन हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. आमदारांना हॉटेलमध्ये नेण्याआधी शिवसेनेची सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतील इन्साईड स्टोरी सूत्रांद्वारे समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आमदारांना विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे आमदारांना आपल्या नातेवाईक आणि जवळच्या मित्रांसोबतदेखील न बोलण्याचा आदेश देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचा विजय झाला. पण शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीत भाजपने सातवा उमेदवार उभा केला होता. त्यामुळे ही निवडणूक जास्त चुरशीची ठरली. विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. अखेर या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. तर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले. हा पराभव शिवसेनेच्या प्रचंड जिव्हारी लागला आहे. त्यामुळे येत्या विधान परिषद निवडणुकीत आपल्याला भाजपचा बदला घेता यावा, असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. बदला वगैरे बाजूला पण आपले दोन्ही उमेदवार जिंकून यावे यासाठी शिवसेनेकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सर्व आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. ( शेम टू शेम, मुंबईच्या जुळ्या भावांना दहावीत एकसारखेच गुण, SSC परीक्षेत घवघवीत यश ) या निवडणुकीत आमदारांचं गणित चुकू नये यासाठी शिवसेनेचा प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे शिवसेना आमदारांना काही आदेश देण्यात आले आहेत. विधान परिषद निवडणूक अटीतटीची होऊ शकते. अनेक नकारात्मक राजकीय घडामोडी घडू शकतात. त्यामुळे आमदारांनी गाफील राहू नये. हॉटेलमध्ये नातेवाईक आणि मित्रांपासून दूर राहा. आपल्याला विधान परिषद निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायचीच आहे, अशा सूचना शिवसेना आमदारांना देण्यात आल्या आहेत. भाजपची देखील हॉटेल डिप्लोमसी दरम्यान, महाविकास आघाडी पाठोपाठ आता भाजपने देखील हॉटेल डिप्लोमसी सुरु केली आहे. भाजपचे सर्व आमदार उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. भाजपच्या सर्व आमदारांना उद्या दुपारी तीन वाजता मुंबईच्या प्रसिद्ध ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बोलावण्यात आलं आहे. तिथेच त्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपते सर्व आमदारांची उद्या संध्याकाळी साडेसहा ते साडेसात दरम्यान बूथरचना बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस राष्ट्रीय उपाध्यक्ष बूथ रचना संदर्भात मार्गदर्शन करतील. त्यानंतर साडेसात वाजता भाजप नेते देवेंद्र फडणवीस विधानपरीषद निवडणूक संदर्भात सर्व आमदारांना मार्गदर्शन करतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या