मुंबई, 18 जून : मनसेचे माजी आमदार आणि नेते शिशिर शिंदे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेमुळे मनसेनंही त्यांना आताच रामराम ठोकलाय. मनसेनं आपल्या नवीन कार्यकारिणीतून शिशिर शिंदेंना डच्चू दिलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत औपचारिकरित्या निवडणूक घेण्यात आली असून नवीन कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली आहे. यात शिशिर शिंदे वगळता इतर नेते आणि सरचिटणीस यांना कायम ठेवण्यात आलंय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पक्षाध्यक्षपदी पुनर्निवड करण्यात आली असून १० नेते तर १२ सरचिटणीस अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
नेत्यांमध्ये बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर आणि अनिल शिदोरे यांचा समावेश आहे. तर मनोज चव्हाण, आदित्य शिरोडकर, संदीप देशपांडे, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता यांची सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. शिशिर शिंदे यांचं नाव वगळल्याने शिंदे हे शिवसेनेत जाणं ही फक्त औपचारिकता मानली जातीये.