JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Coronavirus : जीव वाचवण्यासाठी मुंबईत लागत आहेत रांगा; आप्तांची भीषण वणवण!

Coronavirus : जीव वाचवण्यासाठी मुंबईत लागत आहेत रांगा; आप्तांची भीषण वणवण!

Corona चा संसर्ग झाल्याचं कळल्यावर जीव वाचवण्यासाठी औषधोपचार वेळेवर सुरू व्हायला हवेत आणि नेमकं त्यासाठीच वणवण फिरायची आणि रांगा लावायची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जुलै : Coronavirus ची लागण झाली आहे, हे सांगणारा रिपोर्ट आला की, आधीच रुग्णाचा आणि नातेवाईकांचा जीव कावराबावरा होतो. त्यात covid रुग्णांना असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. जीव वाचवण्यासाठी औषधोपचार वेळेवर सुरू व्हायला हवेत आणि नेमकं त्यासाठीच वणवण फिरायची आणि रांगा लावायची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर येत आहे. COVID चे रुग्ण जसजसे वाढत आहेत, तसतशी औषधांची चणचण जाणवायला लागली आहे. महापालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा असल्याचा दावा केला जात असला, तरी औषध पुरवठादारांकडे मात्र सामान्य नागरिकांनीही रांगा लावल्याचं चित्र सध्या मुंबईत आहे. COVID-19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या लोकांना एक्टेमरा 400 एमजी (ACTEMRA 400) आणि रेमिडीसीव्हर 100 MG (remdesivir)या दोन महागड्या इंजेक्शनची गरज असते. ही इंजेक्शन घाटकोपरच्या एस. के. डिस्ट्रिब्युशन इथे मिळतात, असं कळल्यावर करोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईंकांनी काल रात्री या दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मुंबई आणि मुंबईची उपनगरंच नव्हे तर ठाणे, कल्याण, डोंबिवली अगदी उल्हासनगरहून नातेवाईक ही औषधं घ्यायला आले होते. एवढंच नाही तर रत्नागिरीहून देखील कोरोनाच्या औषधांसाठी इथे आलेली लोक आमच्या प्रतिनिधीला दिसली. टोसिलीझुमाब (tocilizumab) हे कोविडवर नियंत्रण मिळवायला मदत करणारं आणखी एक इंजेक्शन. यामुळे कोविड रुग्ण लवकर बरा होतो. डॉक्टर हे इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगत आहेत. त्यामुळे घाटकोपरच्या या दुकानात ही कोविडची औषधं घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. हे वाचा - कोरोनावर वरदान ठरले नेहमी मिळणारे ‘हे’ इंजेक्शन, पण होतोय काळाबाजार! डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन आलेले अनेक रुग्णांचे आप्त या रांगेत काळजीत उभे असलेले दिसले. कल्याण- डोंबिवलीपासून या औषधांचा शोध घेत इथे आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कोरोनाची लागण झालेल्या एका 65 वर्षीय व्यक्तीवर रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहे. त्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी टॉसिलीझीम 400 एमजी या इंजेक्शनची नितांत गरज आहे. त्यासाठी गेली 3 दिवस सादिक सुर्वे शेकडो किलोमीटर फिरले. शेवटी घाटकोपर येथे S K Distributor येते त्यांना हे औषध मिळेल, ही माहिती मिळाल्यानंतर ते थेट या औषधाकरता रत्नागिरीहून मुंबईला 7 ते 8 हजार रुपये खर्च करुन आले. घाटकोपर पश्चिनेला एस के  औषध डीलरच्या दुकानाबाहेर रुगणणाच्या नातेवाईकांची हे औषध खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती काल रात्री उशिरापर्यंत ही गर्दी होती.तर आज सकाळी सुद्धा गर्दी आहे.या इंजेक्शनचा सध्या कमी पुरवठा होत असल्याने आणि मागणी वाढल्याने ही गर्दी होत आहे, असं इथल्या पुरवठादारांचं म्हणणं आहे. वाचा - पुण्यात 10 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये काय सुरू असणार… काय बंद? जाणून घ्या धक्कादायक म्हणजे, या इंजेक्शनचा आता काळा बाजार केला जात आहे. 31 हजार 500 रुपयांना मिळणारे हे इंजेक्शन आता 40 हजार ते 1 लाख 14 हजार रुपयांपर्यत विकलं जात आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आता आधार कार्ड दाखवल्याशिवाय CORONA ची औषधं न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण खरंतर गेल्या काही महिन्यापासून टीसिलिझिम 400 एमजी हे औषध कोरोना रुग्णांना वरदान ठरत आहे, हे लक्षात यायला सरकारला इतका वेळ का लागला आणि लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ लोकांवर आली असताना हजारो रुपयांचे हे औषध लोकांना परवडणार कसं? याच्या किंमतींवर सरकार नियंत्रण आणणार का? लोकांना सरकार दिलासा देणार का? असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे कुणाकडेच नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या