मुंबई, 12 जुलै : आमदार संतोष बांगर (shivsena mla santosh bangar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (cm eknath shinde) भेट घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी शिंदे यांनी बांगर हे जिल्हाध्यक्षपदी कायम राहणार अशी घोषणा करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशालाच चॅलेंज केलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनीही आपली खेळी खेळली आहे. आणि परिणामी बांगर यांना जबर हादरा बसला आहे. संतोष बांगर यांच्या बंडानंतर हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचं मन वळवण्यात उद्धव ठाकरे यांना यश मिळालं आहे. जिल्ह्यातील सहापैकी पाच तालुकाप्रमुख आणि सर्व जिल्हाप्रमुख, शिवाय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि माजी नगरसेवक यांनी ठाकरेंना पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. संतोष बांगर हे बंडखोर शिंदे गटात सामील झाल्याने त्याची जिल्हाप्रमुखपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील इतर सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनींची उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबईत बैठक झाली. येत्या काही दिवसात सेनेचे नवीन जिल्हाप्रमुख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक शिवसेना पदाधिकारी ठाकरेंच्या भेटीसाठी काल सायंकाळी हिंगोली जिल्ह्यातून रवाना झाले आहेत. दरम्यान हिंगोली जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी कोणाकडे देणार, याकडेही पदाधिकाऱ्यांचं लक्ष लागलं आहे. सेनगाव तालुक्यातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, हिंगोली तालुक्यातील उपजिल्हाप्रमुख रमेश शिंदे, त्याचबरोबर कळमनुरी तालुक्यातील काही जिल्हा परिषदेचे सदस्य व पदाधिकारी यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळे रडणारे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर अचानक शिंदे गटात सामिल झाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एवढंच नाहीतर बहुमत चाचणीत बांगर यांनी शिंदे यांना मत दिले होते. त्यामुळे शिवसेनेनं बांगर यांची हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरून आमदार संतोष बांगर यांची हकालपट्टी केली होती.