मुंबई, 16 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या भाषणानंतर भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आम्हाला आता उद्धवजींमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) स्पष्ट दिसू लागले आहेत. दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात आता काहीच फरक राहीलेला नाहीये, हे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो, कुठलीच शंका नाही असं ट्विट नितेश राणेंनी केलं आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. या भाषणातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेनंतर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पहावं लागेल.
फडणवीसांना टोला आज दोन मेळावे असतात एक संघाचा आणि आपला मेळावा आहे. विचार एकच आहे, पण धागे वेगळे आहे. विचार एकच आहे म्हणून युती केली होती. आजही त्यांना वाटतं मुख्यमंत्री व्हावं वाटलं असतं. त्यांनी जर शिवसेनेचे वचन मोडलं नसतं तर तुम्ही मुख्यमंत्री झाला असता. पण तुमच्या नशिबात नव्हतं, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. …म्हणून मी हे पद स्वीकारलं तसंच, ‘तुम्ही वचन मोडलं. आणि मी हे पद स्वीकारलं आणि कारण माझ्या पित्याला वचन दिलं होतं. मी तुमच्या शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवले, असं वचन आणि जबाबदारी घेतली होती. कदाचित जर दिलेले वचन त्यांनी पाळलं असतं तर कदाचित मी राजकीय जिवनातून बाजूला सुद्धा झालो असतो. हे माझं क्षेत्र नाही, मी एक पूत्र कर्तव्य पार पडण्यासाठी ठामपणे उभा आहे’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता आणि बंधू भगिनींनो…असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. मला कल्पना आहे, आपल्याला संधी मिळाली आहे. आपला आवाज कुणीच दाबू शकत नाही आणि आवाज दाबणारा कधी जन्माला येणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘आजचा हा क्षण आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. बाळासाहेबांनी ज्याची सुरुवात केली होती, तो तुमच्या साक्षीने आपणज पुढे नेत आहोत. शस्त्र पुजन केल्यानंतर मी तुमच्यावर फुलं उधळली, कारण तुम्ही माझे खरे शस्त्र आहात’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आज जर हिंदुत्वाला धोका असेल, तर तो परकीयांपासून नाही. तो स्वकीयांपासूनच आहे. हिंदुत्वाच्या शिडीवर चढून इंग्रजांची फोडा आणि झोडा ही निती वापरली जात आहे. यांच्यापासून सर्वांनी सावध राहणं गरजेचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मला स्वत: मी कधी मुख्यमंत्री आहे असं वाटू देत नाही. कारण मी मला तसं कधी वाटत नाही. माझं तर असं म्हणणं आहे, मी तुमच्या घरातलाच माणूस आहे. मी तुमचा भाऊ आहे, ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. काही जण म्हणत होते मी पुन्हा येईन, पण आता बस तिकडेच. कारण संस्कार हे महत्त्वाचे असतात, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला. राजनाथ सिंह हे सावरकर यांच्याबद्दल बोलले, सावरकर आणि महात्मा गांधींबद्दल बोलण्याची लायकी तरी आहे का, महिलांवर अत्याचार वाढत आहे. मी दसऱ्या मेळाव्यात बोललो होते, ‘माय मरो आणि गाय जगो’ हे हिंदुत्त्व नाही. यावर वाद झाला. मग हिंदुत्व म्हणजे काय आहे, कुणाकडून हिंदुत्व शिकायचं? आणि कुणाला शिकवायचं? जर हिंदुत्वाला धोका नाही, आजच जर हे सत्य आहे, तेव्हा हिंदूत्वाला धोका होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे उभे राहिले होते. त्यावेळी अनेकांनी धमक्या दिल्या उडवून टाकू, ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला शिवून जाईल तो रंग देशातून पुसून टाकू असा इशारा बाळासाहेबांनी दिला होता. सकाळी संघाचा मेळावा झाला, मी जे काही बोलतोय याचा अर्थ असा नाही की, मी मोहन भागवत यांच्यावर टीका करत नाही. तुमचीच माणसं जर हे ऐकत नसतील तर ही मेळाव्याची थेरं करायची कशाला. एकीकडे तुमच्या हिंदूत्व म्हणजे, आम्ही कुणाचा द्वेष मत्सर करत नाही, असा विचार तुम्ही देताय पण दिवसाढवळ्या जे दिसतंय, ते मोहन भागवत तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.