मुंबई, 4 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्के बसतायत. आता राष्ट्रवादीचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार संजय दिना पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, अशी सूत्रांची माहिती आहे. संजय दिना पाटील हे 2009 च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 मध्ये भाजपच्या किरीट सोमय्यांनी त्यांचा पराभव केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला आणि भाजपचे मनोज कोटक इथून खासदार म्हणून निवडून आले. घड्याळ सोडून शिवबंधन मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नसतानाही संजय दिना पाटील यांनी मात्र ईशान्य मुंबईमध्ये पक्षाची बाजू सांभाळली होती. आता आधी राष्ट्रवादीसोबत असलेले गणेश नाईक हेही भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरात जितेंद्र आव्हाड यांनीच राष्ट्रवादीचं अस्तित्व कायम ठेवलं आहे, असंच म्हणावं लागेल. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भांडुप, मुलुंड अशा भागात मनसेचं प्राबल्य आहे. त्यामुळे संजय दिना पाटील यांच्या सेनाप्रवेश शिवसेनेला फायद्याचा ठरू शकतो. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर संजय दिना पाटील यांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्याने इथली राजकीय समीकरणं बदलणार आहेत. ======================================================================================= VIDEO: …म्हणून संजय निरुपम काँग्रेसचा प्रचार करणार नाहीत