मुंबई, 26 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे राज्यातील राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. विरोधकांच्या राष्ट्रपती राजवटीच्या मागणीमुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत गुप्त बैठक झाली. परंतु, भाजपचे नेते नारायण राणे यांनी मात्र, अशी बैठक झालीच नाही, असा दावा केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी संध्याकाळी ‘मातोश्री’वर गेलेच नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत अशी कोणतीही बैठक झालीच नाही, असा दावाच नारायण राणे यांनी केला आहे. तसंच, ‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार हे 5 वर्षं टिकणार नाही. कोरोनाला रोखण्यात सरकार सपशेल अपयशी त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अशी मागणी पुन्हा एकदा नारायण राणे यांनी केली. ‘काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना आपल्या मंत्रिपदाची चिंता आहे. त्यामुळे ते सरकार टिकेल असं म्हणत आहे’, असा टोलाही राणेंनी लगावला. विशेष म्हणजे, नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि महापालिकेच्या तावडीतील सर्व रुग्णालय ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली होती. संजय राऊतांचा भाजपला टोला दरम्यान, दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आहे. ‘कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ क्वारंटाइन व्हावे हेच बरे’ असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
तसंच, ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. पण महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील. भाजपवर हा बुमरँग पडेल’, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
त्याआधी राऊत यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल ट्वीट केलं होतं. ‘शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी संध्याकाळी ‘मातोश्री’वर भेट झाली. दोन नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा उडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी’ असा खुलासा राऊत यांनी केला होता. संपादन - सचिन साळवे