मुंबई, 28 जून : मुंबईत या पावसाळ्यातील लेप्टो स्पायरोसिस या आजारामुळे दोघांचे बळी गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भरत काळे अस या पंधरा वर्षीय मुलाचं नाव असून तो कुर्ला पूर्व येथील मिलन नगर भागात राहत होता. तर यात आणखी एक मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवाजीनगर गोवंडी येथील इम्तियाज मोहम्मद अली या वय 28 वर्षीय तरुणाचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. भरतला पायाला जखम झाली होती त्यावर उपचारही सुरू होते. मात्र ही जखम वाढत गेली म्हणून त्याला रविवारी सायन येथील टिळक रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. रविवारी मेडिकल रिपोर्ट आल्यावर त्याला लेप्टोची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आणि सोमवारी रात्रीच त्याचा मृत्यू झाला. भरत हा आपल्या मित्रांसोबत परिसरात असलेल्या एका मैदानात फुटबॉल खेळत असताना त्याला या लेप्टोची लागण झाली . कुर्ल्यात अशी अनेक मोकळी मैदाने आहेत ज्यामध्ये चिखल साठून त्यात पाळीव पाण्यांचा वावर देखील आहे. अशा मैदानात पालिकेने आता योग्य खबरदारी घेणार गरजेचं आहे. त्याचबरोबर पावसाळा असल्यामुळे स्वत:ची काळजी घ्या. कोणताही त्रास झाला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण पावसाळ्यात अनेक रोगांची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो आरोग्याशी खेळ करू नका.