मुंबई, 5 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे हे वाय बी चव्हाण सेंटरमधून बाहेर पडल्यावर त्यांनाही तुंबलेल्या पाण्यातून आपली गाडी न्यावी लागली. सुप्रिया सुळे यांनी याळेस फेसबुक लाईव्ह केलं. शरद पवार यांनीदेखील आपण दक्षिण मुंबईत असं पाणी साचल्याचं कधीच पाहिलं नसल्याचं सांगितलं आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. या भागात विक्रमी पावसाची नोद झाली असून जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालं आहे. ट्रेन बंद पडून अनेक लोक अडकले. बेस्टच्या बसेसही रस्त्यावरच उभ्या राहिल्याचं चित्र आहे. अशातच नेते मंडळींनाही या पावसाचा फटका बसल्याचं दिसत आहे.
दरम्यान, दक्षिण मुंबईत वादळ वारा व जोरदार पाऊसमुळे काही ठिकाणी वृक्ष पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग, शहीद भगतसिंग मार्ग, महात्मा फुले मंडई, वूड हाऊस मार्ग कुलाबा, बॅकाबे आगार समोर या भागात वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झालं होतं, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आज यंदाच्या मोसमातील 12 तासातील सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये शहर परिसरात 215.8 मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये 101.9 मिलीमिटर; तर पश्चिम उपनगरांमध्ये 76.03 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 309 मिलीमीटर पाऊस महापालिकेच्या ‘डी’ विभाग परिसरात नोंदविण्यात आला आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आज वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचाही सर्वाधिक वेग नोंदविण्यात आला. मरीन लाईन्स परिसरात दरताशी तब्बल 101.4 किलोमीटर एवढा वाऱ्यांचा कमाल वेग सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास नोंदविण्यात आला.