JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राजीनामा देणार, खात्रीलायक सूत्रांची माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राजीनामा देणार, खात्रीलायक सूत्रांची माहिती

मुख्यमंत्री आज रात्रीच राजीनामा देण्याची शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 जून : राज्याच्या राजकारणातील आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) संकटात सापडलं आहे. राज्यपालांनी उद्या फ्लोर टेस्टचे आदेश दिले आहेत. पण मुख्यमंत्री या फ्लोर टेस्टला सामोर जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज रात्रीच राजीनामा देण्याची शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. आपल्याच लोकांनी आपल्याला दगा दिला म्हणून मुख्यमंत्री व्यथित झाले आहेत. त्यामुळे ते फ्लोर टेस्टला सामोरे जाणार  नाहीत. त्याऐवजी ते आजच राजीनामा देतील, अशी माहिती खात्रीलायत सूत्रांनी ‘न्यूज18 लोकमत’ला दिली आहे. माझीच माणसं माझ्याविरोधात मतदान करताना पाहायचं नाहीय, असं उद्धव ठाकरे आपल्या निकटवर्तीयांसोबत चर्चा करताना म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या मंत्रिमंडळात औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. या बैठकीत आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी बोलताना मुख्यमंत्री भावूक झाले होते. “तुम्ही जे सहकार्य केले त्यासाठी धन्यवाद! आता जी कायदेशिर प्रक्रिया त्याला सामोरे जाऊ. मला माझ्याच लोकांनी धोका दिला म्हणून सध्याची परिस्थिती निर्माण झाली. हे दुर्देवी आहे. या अडीच वर्षात तुम्ही सहकार्य केलं. माझ्याकडून कुणाचा अपमान झाला असेल, किंवा कुणी दुखावले असतील तर मी माफी मागतो”, असं मुख्यमंत्री आजच्या बैठकीत म्हणाले. ( ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय, औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता ) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री बैठकीत काय म्हणाले याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पक्षांचे सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. तीन वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आले. इतर दोन्ही पक्षांनी चांगलं सहकार्य केलं म्हणून त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. तसेच राजीनामाबाबत त्यांनी कोणतंही विधान केलं नाही, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

दरम्यान, मंत्री राजेंद्र शिंगने यांनी सध्याच्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. आजच्या बैठकीत कोणताही राजीनाम्याचा विषय नव्हता. मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या मनोगतात सर्वांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर कुठलीही चर्चा झाली नाही. अडीच वर्षे चांगले काम केलं याचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली, अशी प्रतिक्रिया शिंगने यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या