....अन् शिंदे सरकार पुन्हा वाचलं
मुंबई, 15 मे : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. राहुल नार्वेकर मुंबईत दाखल झाल्यानं शिंदे गटानं सुटकेचा निश्वास सोडला आहे. आजच ठाकरे गटानं विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली होती. अध्यक्ष परदेशात असल्यानं उपाध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. ठाकरे गटाच्या या मागणीनं खळबळ उडाली होती. मात्र त्यानंतर अध्यक्ष नार्वेकर लंडनहून अबुधाबी मार्गे मुंबईत दाखल झाले आहेत. नार्वेकर मुंबईत परतल्यानं शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. काय आहेत सुप्रीम कोर्टाचे आदेश? राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टानं गेल्या आठवड्यातच निकाल दिला आहे. निकालावेळी सुप्रीम कोर्टाकडून शिंदे सरकार आणि तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले. शिंदे गटाकडून नियुक्त करण्यात आलेले मुख्य प्रतोत गोगावले यांची नियुक्ती नियमाबाह्य असल्याचं यावेळी न्यायालयानं म्हटलं. त्यानंतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असा आदेश न्यायालयानं दिला. विधान सभा अध्यक्ष निर्णय घेणार असल्यानं शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला.
उपाध्यक्षांकडे मागणी मात्र त्यानंतर विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विदेश दौऱ्यावर गेले होते. आज ठाकरे गटानं विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेत अध्यक्ष भारतात नसल्यानं आमदारांच्या अपात्रतेबाबत आपण निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती. या मागणीने मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता राहुल नार्वेकर हे लंडनहून भारतात परतले आहेत. आमदारांच्या अपात्रेचा निर्णय मीच घेणार असं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलं आहे.