मुंबई, 01 आॅगस्ट : मुंबई विद्यापीठाच्या निकालांची 31 जुलैची मुदतही पाळण्यात विद्यापीठ आणि कुलगुरू अयशस्वी झालेत. त्यावर ‘सामना’मधल्या संपादकीयात त्यावर प्रचंड टीका झालीय. ‘मुंबई विद्यापीठात ऑनलाइन पेपर तपासणीचा आग्रह कुलगुरू देशमुखांनी धरला होता. विद्यापीठाच्या मॅनेजिंग कमिटीने ऑनलाइन पेपर तपासणीस विरोध करूनही कुलगुरूंनी त्यासाठी हट्ट धरला व निकालांचे श्राद्ध घातले,’ अशा शब्दांत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर टीका केली आहे. या संपादकीयांमध्ये असंही म्हटलंय की, ’ राज्य चालविणे म्हणजे एकाच विचाराच्या लोकांनी खुर्च्या उबवणे असे नाही. सध्या सर्वच घटनात्मक पदांवर संघविचाराच्या लोकांच्या नेमणुका सुरू आहेत. केंद्रापासून राज्यापर्यंत त्याच विचारांचे सरकार असल्यावर या गोष्टी होणारच. मात्र अशा नेमणुका करताना संघविचाराबरोबरच क्षमता आणि गुणवत्तेचा विचार अधिक व्हायला हवा.’ जाता जाता त्यांनी एक टोलाही हाणलाय. ते म्हणालेत, ‘मुंबई विद्यापीठातील अनागोंदीमुळे चार लाख विद्यार्थ्यांच्या जीवनात जे ‘खड्डे’ पडले आहेत त्यावरही कुणी तरी आता ‘मुंबई, तुझा विद्यापीठावर भरवसा नाही काय!’ असे गाणे वाजवायला हरकत नाही!