मुंबई, 28 फेब्रुवारी : पूजा चव्हाण (Pooja Chavan case) आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या राजीनाम्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपनेही संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. जर राठोड यांचा राजीनामा घेतला नाहीतर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे (BJP) सगळे सदस्य राजीनामा देतील, अशा इशारा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिला आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. ‘कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल काही बोलायलाच नको राज्यात महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत. आता याबद्दल बोलायची काय सोय राहिली आहे, मंत्री आणि सत्ताधारी नेते यावर आघाडीवर आहेत. संजय राठोडांच्या संदर्भातले सगळे पुरावे असताना साधा एफआयआर देखील दाखल नाही. पोलिसांची इतकी लाचार अवस्था आहे आधी कधीच पाहिली नाही. पुण्यातील पोलीस निरीक्षकांना तात्काळ निलंबित करावं त्यांना नोकरीत राहायचा कोणताही अधिकार नाही, असं फडणवीस म्हणाले. ‘यापेक्षा अधिक पुरावे कोणत्याही केसमध्ये नाही. राज्यांत या सरकारचा चेहरा उघड झाला आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते असतील, ज्यांच्यावर एफआयआर दाखल झाल्यावरही कारवाई नाही. धनंजय मुंडेंबाबतचा प्रश्न संपलेला नाही. सत्तेतल्या लोकांना लैंगिक स्वैराचाराची भूमिका या नव्या कायद्यात आहे का? जर संजय राठोड यांचा राजीनामा देण्यात आला नाही तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सगळे सदस्य राजीनामे देतील,’ असा इशारा फडणवीस यांनी दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावकर यांच्याबद्दल रोखठोक भूमिका मांडली होती. पण त्यांचे सुपुत्र सावरकर जयंतीला आदरांजली वाहात नाही, ही सत्तेची लाचारी आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ‘सत्ता येते आणि जाते पण इतिहास लिहून जातो कोण सत्तेसाठी किती लाचार होतो. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत आम्ही सरकारच्यासोबत आहोत. मग ही अस्मिता संभाजीनगर नामांतराबाबत कुठे जाते कोविडमध्ये मोठा आणि संतापजनक भ्रष्टाचार झाला आहे. असयहनीय भ्रष्टाचार झाला आहे. यावर पुस्तिका काढणार आहे’, असंही फडणवीस म्हणाले. नामदेव महाराजांची ७५० जयंती आहे. हे गेल्या अधिवेशनावेळी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं होतं या संदर्भात सरकारने काहीही केलेलं नाही. संतांच्या यादीत नामदेवांचं नाव का नाही? असा सवालही फडणवीसांनी विचारला. मराठा आरक्षणाबाबत 8 मार्चला सुनावणी आहे. आज त्याची बैठक आहे. त्याचं निमंत्रण बोलावलं आहे त्याबद्दल मी आभारी आहे. याबद्दल सगळी मदत आम्ही सरकारला करु फक्त सरकारने टोलवाटोलवी करु नये, असंही फडणवीस म्हणाले. संजय राऊत यांनी राजदंड सरकारला दाखवलेला दिसतोय. त्यांच्याविरोधात केस दाखल झालीये हे बातम्यात पाहिलंय त्याची माहिती मी घेत आहे, असा टोलाही फडणवीस यांनी राऊत यांना लगावला.