(कल्याण रेल्वे स्टेशनवरील दृश्य)
गणेश गायकवाड, प्रतिनिधी कल्याण, 27 जुलै : मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाने धुमशान घातले आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. कल्याण स्टेशन परिसरात रेल्वे रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. ऐन संध्याकाळी घराकडे निघालेल्या चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सध्या कल्याणमध्ये जोरदार पाऊस पडत असल्याने त्याचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. पावसामुळे लोकल सेवेचा वेळापत्रक कोलमडलं असून लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. मुंबईकडे त्याचबरोबर कर्जत आणि कसाराच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही मार्गावर लोकल उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांचे परतीच्या वेळेस हाल होत आहेत.
तर डोंबिवलीमध्येही पावसाचा हाहाकार उडाला आहे. स्टेशनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. गुडघाभर पाण्यातून डोंबिवलीकर वाट काढत आहे. ऐन संध्याकाळी पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. (नागपूरमधल्या पावसानं मोडला 29 वर्षांचा रेकॉर्ड, 24 तासांमध्ये रस्त्यांना आलं नद्यांचं स्वरुप, Video) तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील अनेक ठिकाणच जनजीवन विस्कळीत झालं आहे. डहाणू जव्हार नाशिक राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. विक्रमगड मधील तलवाडा येथे महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणातून विसर्ग सुरू असल्याने तलवाडासह परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. महामार्ग लगत असलेल्या दुकानांमध्येही पाणी शिरलं आहे. अजूनही पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी कायम आहे. मुंबईतल्या पावसानं मोडला जुलै महिन्याचा रेकॉर्ड दरम्यान, मुंबईत बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलंय. या पावसामुळे शहरातील रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईतीलजुलै महिन्यातल्या पावसाचा रेकॉर्ड यंदा मोडीत काढला असल्याची माहिती हवामान विभागानं दिलीय. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे 124.8 मिमी आणि 124 मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे. चर्चगेट, मरीन लाइन्समध्ये रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. दादर, माटुंगा, किंगसर्कल, लालबाग, अंधेरी, कुर्ला आदी ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे. मुंबई महापालिकेचे कर्मचारी पाण्याच्या निचऱ्यासाठी काम करत आहेत. सततच्या मुसळधार ते अती मुसळधार पावसामुळे पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.