मुंबई, २१ नोव्हेंबर : 26/11प्रकरणी जिवंत पकडला गेलेला एकमेव हल्लेखोर. २१ नोव्हेंबर २०१२ रोजी फाशी झाली. अजमल कसाबला पकडल्यानंतर फासावर लटकवण्यापर्यंतचा प्रवासही सोपा नव्हता. कसाबचा अंत पाहिलेल्या आणि ते मिशन X यशस्वी करणाऱ्या राज्याच्या कारागृह विभागाच्या तत्कालीन प्रमुख मीरां चड्ढा बोरवणकर यांनी न्यूज18 लोकमतबरोबर शेअर केलं त्या मोहिमेचं सिक्रेट. “त्यानं आपल्या देशाच्या निरागस नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्या दहशतवाद्याशी सामना करताना महाराष्ट्र पोलिस विभागातले धडाडीचे अधिकारी आणि कर्मचारीही शहीद झाले होते. त्या अजमल कसाबला त्याच्या अंतिम प्रवासापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमच्यावर होती. 26/11च्या प्रकरणाचा शेवट आम्ही केला…. मिशन एक्स अत्यंत गुप्तपणे पार पडलं…. " माजी IPS अधिकारी मीरां चड्ढा बोरवरणकर सांगत होत्या. तो १५० किलोमीटरचा सिक्रेट प्रवास कसाबला आर्थर रोड तुरुंगात ठेवलं होतं. त्याचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर दोनच आठवड्यात त्याला अत्यंत गुप्तपणे पुण्याच्या येरवडा कारागृहात आणलं गेलं आणि येरवड्यातच फाशी देण्यात आलं. या सगळ्या गुप्त मोहिमेत महत्त्वाची कामगिरी बजावली मीरां चड्ढा बोरवणकर यांनी. आजपासून बरोबर ६ वर्षांपूर्वी - २१ नोव्हेंबरला सकाळी ठीक ७.३० वाजता अजमल कसाबला फाशी देण्यात आली. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, कसाबला मुंबईहून पुण्याला नेण्यात येणार आहे आणि फाशीची तारीख पक्की केली असल्याची माहिती त्यांच्या मंत्रिमंडळातल्या इतरांनाही नव्हती. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या व्यक्ती या मोहिमेत सामील होत्या. “या मोहिमेत गुप्तता हेच मोठं आव्हान होतं”, असं मीरां चड्ढा बोरवणकर सांगतात. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जमान्यात या महत्त्वाच्या मोहिमेची खबर माध्यमांना सोडाच पण पोलीस दलातल्या किंवा कारागृह प्रशासनातल्यासुद्धा सगळ्यांना माहिती नव्हती. “आर. आर. पाटील हे तेव्हा राज्याचे गृहमंत्री होते आणि ते आम्हाला नेहमी सांगायचे की, या मिशनविषयी कुणाला काही समजलं तर कदाचित विरोधी देश यामध्ये हस्तक्षेप करतील. त्यामुळे हे सिक्रेट ठेवणं हेच मोठं काम होतं. महाराष्ट्राच्या कारागृह विभागातल्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मिशन एक्स यशस्वी झाल्याचं श्रेय जातं.” मिशन एक्स मुंबईचा आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून येरवड्याच्या कारागृहात आणण्याची मोहीम म्हणूनच कठीण होती. “या मिशनला कुठलं नाव द्यावं याची चर्चा झाली आणि शेवटी मिशन एक्स असं नाव मी दिलं कारण ते अगदी न्यूट्रल होतं”, त्या म्हणाल्या. तुरुंगात अधिकाऱ्यांनाही मोबाईल घेऊन जायची परवानगी नव्हती आणि सर्व कडक नियम कटाक्षानं पाळले जात होते. अगदी कसाबला फाशी दिल्याचा मेसेजसुद्धा मीरा बोरवणकर यांनी आधीच टाईप करून ठेवला होता आणि केवळ फाशीच्या दिवशीच त्यांनी मोबाईल जवळ ठेवला होता. त्या क्षणी विलंब होऊ नये म्हणून आधीच टाईप केलेला तो मेसेज गृहमंत्र्यांना केला. फाशीची प्रॅक्टिस “कुणालाही फाशी देणं ही एक मोठी कायदेशीर प्रक्रिया असते. अनेक गोष्टी त्यात येतात. रिहर्सल केल्या जातात. हे सगळं कसाबच्या बाबतीत झालं होतं, पण या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही इतक्या गुप्तपणाने. १ महिना आम्ही सतत यासाठी काम करत होतो. योगेश देसाई आणि त्यांची टीम कायदेशीर प्रक्रियेवर बरंच काम करत होती. काम म्हणजे प्रत्यक्ष फिजिकल अॅक्टिव्हिटी, पेपरवर्क आणि इतर कायदेशीर कामं तर ६ महिन्यांपासूनच सुरू होती”, मीरां यांनी सांगितलं. एक महिला अधिकारी म्हणूनच… 26/11चं अंतिम प्रकरण मिशन एक्स मोहिमेनं लिहिलं. या मोहिमेचं नेतृत्व करण्याचं आव्हान पोलीस अधिकारी म्हणून मोठं होतंच, पण एक महिला अधिकारी म्हणून खरी परीक्षा होती. “त्यासाठीच फाशीच्या दिवशी मी प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहणं आवश्यक होतं. भारताच्या महिला कुठलंही आव्हान घ्यायला तयार आहेत, असाच संदेश मला जायला हवा होता”, त्या सांगतात. डोकं सुन्न झालं होतं… “प्रत्यक्ष फाशी दिल्यानंतर पुढचे काही दिवस डोकं सुन्न झालं होतं. डिस्ट्रेस नव्हते, पण काम पूर्ण केल्याचं समाधान मनात होतं. माझ्या बरोबरच्या इतर पुरुष सहकाऱ्यांच्याही याच भावना असतील”, असं मीरां म्हणाल्या. टीमवर्कला श्रेय “मुंबईहून बुलेटप्रूफ गाडीतून कसाबला पुण्याच्या कारागृहात आणण्यात आलं. त्यामुळे या मोहिमेत हायवे ट्रॅफिक पोलीसपण सामील होते. रेव्हेन्यू अथॉरिटी आणि पुणे पोलिसांनाही याबाबत माहीत होतं. तरीही कुणी या मोहमेची वाच्यता केली नाही. महाराष्ट्र पोलीस, कारागृह पोलिसांना स्टाफ, कर्मचारी ट्रॅफिक पोलीस, मंत्रालय अधिकारी आणि कर्मचारी यांचं टीम वर्क प्रोजेक्ट एक्स यशस्वी करू शकलं आणि 26/11 प्रकरणाच्या शेवटाचे आम्ही साक्षीदार ठरलो.”
VIDEO : ‘आता रडायचं नाही, तर लढायचं’, शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर!