मुंबई, 11 जुलै : शिवसेना (Shivsena) पक्षाला मोठं भगदाड पडल्यानंतर आता उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे आमदारांनंतर आता खासदारही बंडाच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दोन्ही गटांकडून शिवसेना पक्षावर दावा सांगितला जात आहे. आता हा वाद तळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर दादर माहिम विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांमध्येच राडा झाला. याचा व्हिडीओ आता समोर आलं आहे. काय आहे प्रकरण? आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेना पक्षाकडून त्यांची पदं काढून घेतली जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरांच्या निकटवर्तीय लोकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. यावरुन आता दादर माहिम विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांमध्येच राडा झाला आहे. माजी नगरसेवक मिलिंद वैद्य आणि शाखाप्रमुख मिलिंद तांडेल याच्यात हा वाद झाला आहे. सदा सरवणकर हे नुकतेच शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे बॅनर आणि पक्षाच्या विचारावरून समर्थकांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरेंवरील दबाव वाढला राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मातोश्रीवर बैठक बोलावली होती. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं चर्चेची दारं उघडी राहतील, असं मत खासदारांनी व्यक्त केलं आहे. देशात भाजपने मोठी ताकद निर्माण केली आहे, आपण त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. शिंदेसोबत 50 आमदार आहेत. ते आजही मनाने आपलेच आहेत. आपण एकनाथ शिंदेंशीही जुळवून घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदे आणि भाजपनं सत्ता स्थापन केली आहे. आपण दोघांशीही जुळवून घेतलं तर भविष्यात पक्षाचं हिताचं होणार आहे.
शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट येणार एकत्र? दीपक केसरकरांचं मोठं विधान
सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. एक सर्वसाधारण शिवसैनिक बोलू शकत नाही. बाळासाहेबांचे जुने शिवसैनिक बोलू शकत नाही. मन दुखवण्याचे प्रकार सोडून द्यावे. सर्व सामान्य शिवसैनिकांना वाटत नाही, काँग्रेसबरोबर जावे. तुम्ही हवे तर जनमताचा कौल घ्यावा. नगरपचायंचीच्या निवडणुका झाल्या. त्यात दिसून आले. आमची शक्ती काँग्रेस-राष्ट्रवादीने घ्यायची आणि आमचीच पक्ष संपवायचा हे योग्य नाही, अशी टीका केसरकरांनी केली. तसंच, मला विश्वास आहे की साहेब लवकरच आम्हाला आशिर्वाद देतील. 1-2 सदस्य असे आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंची रोज भेट मिळते, असा खुलासाही केसरकरांनी केला.