मुंबई, 16 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांकडून प्रचंड चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यांना राज्यभरातील अनेक पदाधिकारी, नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला आहे. शिंदे यांच्या गटात आज बदलापूरमधील शिवसेनेचे सर्व नगरसेवक दाखल झाले आहेत. त्यामुळे हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ठाण्यातील सर्वच शिवसैनिकांनी आणि नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यानंतर कल्याण डोंबिवलीतील अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवल्याची बातमी समोर आली होती. विशेष म्हणजे शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत थेट एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मुख्य शिवसेनेला खूप मोठं खिंडार पडल्याचं मानलं जात होतं. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला धक्का देणाऱ्या घटना आज पुन्हा घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात पुण्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर बदलापूरमधील सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांनी, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. हा मुख्य शिवसेनेसाठी मोठा झटका मानला जातोय. ठाणे जिल्ह्यात तर जिथे बघाव तिथे शिंदे समर्थकच दिसत आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची पोकळी उद्धव ठाकरे कशी भरुन काढतील? हा मोठा सवाल आहे. ( ‘मला सरप्राईज गिफ्ट मिळालं’, फडणवीसांनी जाहीर सभेत बोलून दाखवली नाराजी ) मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर नगरपालिकेचे 25 नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्षांसह सभापती आणि पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. बदलापूरमधील शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आपल्या समर्थकांसह शिंदे गटात सामील झाले आहेत. ठाण्यात एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी शिंदे गटात सामील होण्यासाठी 25 नगरसेवकांसह सर्व पदाधिकारी आज दाखल झाले. शिंदे यांच्या उपस्थित त्यांचा प्रवेशाची अधिकृत प्रक्रिया पार पडली. दरम्यान, ठाण्याचे शिंदे गटाचे अध्यक्ष नरेश म्हस्के यांनी या विषयी प्रतिक्रिया दिली आहे. “बदलापूर नगरपालिकेचे आमचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि सदस्य, त्याचबरोबर शहापूर नगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी आले आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने शिंदे गटात सहभागी झाले आहेत”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.