अरे देवा! घर बांधणं आणखी महागणार, ‘या’ गोष्टींचे वाढू शकतात दर
मुंबई, 25 ऑक्टोबर: स्वत:च्या मालकीचं एक घर असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपलं घर कसं असावं याबाबत प्रत्येकाच्या मनात काहीना काही कल्पना असतात. त्यानुसार आपण घर बांधण्याचा किंवा खरेदी करण्याचा विचार करतो. मात्र, सध्याच्या काळात जमिनीचे आणि घरांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यानं घर खरेदी करण्यासाठी आयुष्यभराची कमाई पणाला लावावी लागते. दिल्ली-मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये स्वत:च्या मालकीचं तर सोडाच; पण भाड्यानं घर घेणंदेखील सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये नवीन घराची स्वप्नं बघणाऱ्या लोकांसाठी आणखी एक वाईट आली बातमी आहे. येत्या काळात घराच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोविड-19 चा प्रभाव कमी झाल्यानंतर आणि आता पावसाळा संपल्यानंतर बांधकामांना पुन्हा एकदा वेग आला आहे. त्यामुळे सिमेंटच्या मागणीत वाढ होऊन दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयआयएफएल सिक्युरिटीजचं म्हणणं आहे की, डिसेंबर महिन्यापर्यंत सिमेंट कंपन्या वेगवेगळ्या टप्प्यांत सहा ते आठ टक्क्यांनी किमती वाढवू शकतात. सिमेंट बनवण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे वाढलेल्या खर्च वसूल करण्यासाठी कंपन्या ग्राहकांवर काही भार टाकू शकतात. सिमेंटच्या मागणीत वाढ- दालमिया, जे. के. सुपर सिमेंट आणि अल्ट्राटेक यांनी एका बैठकीत नमूद केल्यानुसार, सप्टेंबर तिमाहीत त्यांच्या कमाईवर परिणाम झाला आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीजचं म्हणणं आहे की, सप्टेंबर तिमाहीत सिमेंटच्या सरासरी किमती 5.5 टक्क्यांनी कमी झाल्या होत्या. परंतु, आता त्यात पुन्हा वाढ होईल. सरकार इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांवरील खर्च वाढवत आहे. ज्यामुळे सिमेंट कंपन्यांना आधार मिळेल. रेटिंग एजन्सी असलेल्या क्रिसिलनंही सिमेंटच्या मागणीत आणि किमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. **हेही वाचा:** गृहकर्जाच्या बोझ्यातून बाहेर कसं पडायचं? सोप्या शब्दात घ्या समजून घर बांधणं महागणार- सिमेंटच्या किमती वाढल्यास ग्राहकांना दुहेरी फटका बसू शकतो. नवीन घर बांधण्याचा खर्च वाढेल. या शिवाय, सिमेंटच्या वाढलेल्या किमतीचा हवाला देऊन बिल्डर फ्लॅटच्या किमतीही वाढवू शकतात. रेपो दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांवर आधीच जास्त EMI चा दबाव आहे. अशा परिस्थितीत सिमेंटच्या किमती वाढल्याने ते अधिक अडचणीत येऊ शकतात.
ऑफिस स्पेसची मागणी वाढली- देशातील सात प्रमुख शहरांमध्ये सप्टेंबर महिन्यात इमारतींच्या सर्व श्रेणींमध्ये भाडेतत्त्वावर घेतलेल्या ऑफिस स्पेसची मागणी वाढली आहे. एका वर्षासाठी 37 टक्क्यांनी वाढून 6.3 दशलक्ष चौरस फूट, इतकी ही वाढ आहे. मालमत्ता सल्लागार फर्म जेएलएल इंडियाच्या अहवालानुसार, ऑफिस स्पेस भाड्याने घेण्याच्या मागणीमुळे मार्केटमध्ये व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. या अहवालात, राष्ट्रीय राजधानी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, पुणे आणि कोलकाता या सात प्रमुख शहरांतील ऑफिस स्पेस मार्केटमधील स्थितीचा समावेश करण्यात आला आहे.