मुंबई, 17 सप्टेंबर- तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर आर्थिक अडचणी येणं नवीन नाही. कधी मालाची चोरी होणं, ऑफिस फोडून पैसे चोरीला जाणं अशा घटना घडतातच. पण जर मनी इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल तर फायदाच होतो. विविध कंपन्याच्या इन्शुरन्स पॉलिसी मार्केटमध्ये उपलब्ध असतात. मनी इन्शुरन्समुळे अडचणीच्या वेळेस ग्राहकाला आधार मिळतो. व्यवसायातलं नुकसानही विमा पॉलिसीमुळे भरून निघते. विमा पॉलिसीमुळे चोरी, दरोडा, मालाची झालेली लूट या आर्थिक संकटांपासून आर्थिक संरक्षण मिळतं. आर्थिक विमा काढताना त्यातील नियम व अटी वाचणं गरजेच असतं. तसंच तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य ते पर्याय निवडू शकता. विमा पॉलिसी तज्ज्ञांच्या मते, मोठे आर्थिक व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांनी विमा काढणं अनिवार्य आहे. कारण अशाच व्यवसायात चोरी, दरोडा, लूटमार याची शक्यता जास्त असते. आर्थिक विम्याची अशावेळेस मदतच होते. म्हणूनच चोरी, दरोडा यासारख्या घटना घडल्यास व्यावसायिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी क्लेम करू शकतात. सर्व प्रकारचे लिक्विड फंड अर्थात रोखरक्कम, धनादेश, ड्राफ्ट, ट्रेझरी नोटस, आर्थिक चलन किंवा पोस्टल ऑर्डरद्वारे आर्थिक विमा सुरक्षेचे पैसे मिळतात. आर्थिक विम्यासाठी दिली जाणारी प्रीमियमची रक्कम कमी असते ही याची जमेची बाजू. यासोबतच मिळणारं आर्थिक संरक्षण खूप असतं. हा प्रीमियम मासिक, तिमाही, सहामाही याप्रमाणे भरण्यची सुविधा असते. आपण नेहमीच हेल्थ, लाईफ किंवा वाहन विमा पॉलिसी घेतोच; पण व्यवसायासाठी कधीच पॉलिसी घेत नाही. आर्थिक विम्यामुळे संकटसमयी मिळणार्या पैशांबद्दल निश्चिंती असते. तसंच तुमच्या दुकानात होणाऱ्या चोरी, दरोड्यासारख्या संकटांना आर्थिक विम्याद्वारे संरक्षण मिळतं. (हे वाचा: LICची जबरदस्त स्कीम! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा ) कधी-कधी एखाद्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे आर्थिक संकट सोसावं लागतं. अनेकदा एखाद्या नोकराकडून व्यवसायात आर्थिक नुकसान होतं. अशावेळी जर विमा नसेल किंवा तो विमा घेतलेल्या व्यावसायिकाचा कर्मचारी नसेल तर या गोष्टी आर्थिक विम्यांतर्गत येत नाहीत. नुकसानभरपाई मिळत नाही. तसंच पूर, चक्रीवादळ, युद्ध किंवा युद्धामुळे झालेलं नुकसान या गोष्टी आर्थिक विम्यात कव्हर नसतात. म्हणून आर्थिक विमा किंवा कुठलीही विमा पॉलिसी घेताना आपण नियम व अटी वाचणं गरजेचं आहे.रोजच्या जगण्यातली संकट, दुर्घटना यांचा विचार करून विमा पॉलिसी घेणं आवश्यक आहे. कारण सुखी जीवनासाठीची आर्थिक तरतूद महत्त्वाची आहे.