क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये असतात हे महत्त्वाचे तपशील, समजून घ्या सोप्या शब्दात
मुंबई, 25 ऑक्टोबर: पेमेंट किंवा खरेदी करण्याचा एक सोयीस्कर मार्ग म्हणून क्रेडिट कार्ड वापरलं जातं. सध्या क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला आहे. आजकाल मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही क्रेडिट कार्डचा सर्रास वापर होत आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुमच्याकडे स्टेटमेंटच्या स्वरूपात दर महिन्याला केलेल्या ट्रान्झॅक्शनचा तपशील असतो. त्यात अनेक लहान-मोठे तपशील आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड बिलातील त्रुटीदेखील शोधू शकता. क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये खालील तपशील दिलेले असतात. क्रेडिट कार्ड बिलिंग सायकल- क्रेडिट कार्ड बिलिंग सायकल हे स्टेटमेंट सायकल म्हणूनही ओळखलं जातं. क्रेडिट कार्ड अॅक्टिव्ह झाल्याच्या दिवसापासून बिलिंग सायकल सुरू होते. बिलिंग सायकल कालावधी 28 ते 32 दिवसांपर्यंत असू शकतो. पेमेंट ड्यु डेट- क्रेडिट कार्ड बिल भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ‘पेमेंट ड्यु डेट’ आहे. या तारखेनंतर केलेल्या पेमेंटवर दोन प्रकारचं शुल्क आकारलं जातं. तुम्हाला थकबाकीच्या रकमेवर व्याज द्यावं लागेल आणि उशिरा पेमेंट केल्याचा दंडही भरावा लागेल. मिनिमम अमाउंट ड्यु- ही रक्कम एकूण देय किंवा थकित रकमेच्या साधारणपणे 5 टक्के इतकी किंवा सर्वांत कमी रक्कम असते. म्हणजे क्रेडिट कार्डधारकाला त्या महिन्यात बिल भरता येत नसेल किंवा ते भरायला उशीर होणार असेल तर तो हे कमीतकमी बिल भरू शकतो. ही रक्कम काही शे रुपयांमध्ये असते. ती भरल्याने क्रेडिट कार्ड बिल उशिरा भरल्याने ग्राहकाला होणारा दंड टळतो. हेही वाचा: गृहकर्जाच्या बोझ्यातून बाहेर कसं पडायचं? सोप्या शब्दात घ्या समजून टोटल आउटस्टँडिंग- तुम्ही दरमहा एकूण थकबाकी भरली पाहिजे. जेणेकरून क्रेडिट कार्डवर कोणतंही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. एकूण रकमेत ईएमआय आणि बिलिंग सायकल दरम्यान लागणाऱ्या शुल्कांचा समावेश असतो. क्रेडिट लिमिट- तुम्हाला क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये तीन प्रकारच्या लिमिट्स आढळतील. एकूण क्रेडिट लिमिट, उपलब्ध क्रेडिट लिमिट आणि कॅश लिमिट. ट्रान्झॅक्शन डिटेल्स- या सेक्शनमध्ये तुमच्या क्रेडिट कार्ड खात्यात किती पैसे आले आणि किती खर्च झाले याची संपूर्ण माहिती असते. म्हणजे त्या बिलिंग सायकलमधील प्रत्येक आर्थिक व्यवहाराची माहिती तुम्ही इथं पाहू शकता.
रिवॉर्ड पॉईंट्स- क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये, तुम्हाला आतापर्यंत जमा झालेल्या रिवॉर्ड पॉईंट्सचं स्टेटस दिसेल. येथे तुम्हाला मागील सायकलमधून कमवलेल्या रिवॉर्ड पॉईंट्सची संख्या, सध्याच्या बिलिंग सायकलमध्ये मिळवलेले पॉईंट्स आणि कालबाह्य झालेले पॉईंट्स दर्शवणारं टेबल दिसेल.