नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर: एसबीआय कर्ज घोटाळा प्रकरणात (SBI Loan Scam Update) एक मोठी अपडेट समोर येते आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) माजी अध्यक्ष प्रतीप चौधरी (Pratip Chaudhary Arrest) यांना सोमवारी जैसलमेर पोलिसांनी दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. कर्ज घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. जैसलमेरच्या सीजेएम कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रतीप चौधरी यांच्यावर जैसलमेरमधील एक हॉटेल चुकीच्या पद्धतीने विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी आलोक धीर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या प्रकरणातील ही मोठी कारवाई मानली जात आहे. दिल्लीतून अटक केल्यानंतर, सोमवारी, 1 नोव्हेंबर 2021 रोजी पोलीस त्यांच्यासह जैसलमेरला पोहोचले आहेत. चौधरी यांना मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) जैसलमेर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आणि 15 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. बँकेचे माजी चेअरमन प्रतीप चौधरी यांच्या वकिलाच्या वतीने एडीजे न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याची तयारी सुरू आहे. आज सुनावणी झाली नाही तर प्रतीप चौधरी यांची दिवाळी तुरुंगातच साजरी होणार आहे. या प्रकरणी आरके कपूर, एसव्ही व्यंकटकृष्णन, शशी मेथोडिल, देवेंद्र जैन, तरुण आणि विजय किशोर सक्सेना यांच्याविरुद्धही अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. हे वाचा- सध्याच्या वॅल्युएशननुसार IPO मध्ये गुंतवणूक करणार नाही : राकेश झुनझुनवाला काय आहे प्रकरण? जैसलमेरमध्ये, गोदावन समूहाची सुमारे 200 कोटी रुपयांची मालमत्ता बँकेच्या नियमांविरुद्ध 25 कोटी रुपयांना विकली गेली. कर्ज न भरल्याने बँकेने ही मालमत्ता जप्त करण्यात आली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल बांधण्यासाठी या ग्रुपने 2008 मध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 25 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याच वेळी, हा समूह आणखी एक हॉटेल चालवत होता. समूहाला कर्जाची परतफेड करता आली नाही. चौधरी यांच्यावर आरोप आहे की त्यांनी या 200 कोटींच्या संपत्तीच्या एका हॉटेलला NPA घोषित केल्यानंतर 25 कोटीमध्ये त्याची विक्री केली. हे वाचा- PF Interest: पीएफचे व्याजाचे पैसे अजून आले नसतील तर इथे तक्रार करा ही मालमत्ता नॉन-परफॉर्मिंग अॅसेट म्हणून लक्षात घेत, SBI ने समूहाद्वारे बांधले जाणारे हॉटेल आणि त्यांचे एक कार्यरत हॉटेल जप्त केले. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी होते. निवृत्त झाल्यानंतर चौधरी कमी दराने हॉटेल्स खरेदी करणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळात सामील झाले. हॉटेलची विक्री झाल्यानंतर मालक न्यायालयात गेले. खरेदीदार कंपनीने 2016 मध्ये ते ताब्यात घेतले. 2017 मध्ये जेव्हा या मालमत्तेचे मूल्यांकन केले गेले तेव्हा त्याचे बाजार मूल्य 160 कोटी रुपये असल्याचे आढळून आले. आता त्याची किंमत सुमारे 200 कोटी आहे.