नवी दिल्ली, 16 मार्च : रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) संपूर्ण जगभरात परिणाम होत आहे. क्रूड ऑइलच्या वाढच्या दरांमुळे भारतातही पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर (Petrol-Diesel Price) परिणाम होत होता. परंतु पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीपासून लवकरच दिलासा मिळू शकतो, अशी आशा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Price) झालेली मोठी घसरण हे पेट्रोल-डिझेल दर कमी झाल्यास त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. कच्च्या तेलाचा दर 6 टक्क्यांनी अधिक घसरला असून 100 डॉलरहून कमी झाला आहे. मागील तीन आठवड्यांपासून पहिल्यांदाच हा स्तर इतका कमी झाला आहे. रशियाने इराण आण्विक कराराला पुढे जाण्यास परवानगी देण्याचं सुचवल्यानंतर हे बदल झाले आहेत. त्याशिवाय चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. वाढत्या कोरोनामुळे चीनमध्ये लॉकडाउन झाल्यास तेलाच्या मागणीत घट होण्याची भीतीही व्यापाऱ्यांना आहे.
फेब्रुवारीनंतर 100 डॉलरखाली आला दर - ब्रेंट क्रूड आणि यूएस क्रूड फ्युचर्स बेंचमार्क फेब्रुवारीच्या अखेरीस प्रथमच प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आलं आहे. 7 मार्च रोजी 14 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्यापासून ब्रेंट सुमारे 40 डॉलरहून अधिक खाली खाली आलं आहे. दोन आठवड्यांपूर्वी रशिया - युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे दरांमध्ये अस्थिरता आहे.
रशिया कच्चं तेल आणि इंधानाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून अनेक खरेदीदार देशांनी रशियाकडून तेल-इंधन घेण्यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे दररोज लाखो बॅरल कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय येण्याची भीती निर्माण झाली आहे. परंतु आता ही भीती कमी होताना दिसते आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला पूर्णविराम मिळण्याची चर्चा सुरू असल्याने चिंता काहीशी कमी झाली आहे. त्यामुळेच क्रूड ऑइल किमतीवर परिणाम होऊन दर कमी झाला. परंतु अद्यापही अस्थिरता कायम आहे. मात्र दोन्ही देशांमध्ये सकारात्मक गोष्टी घडल्यास त्याचा परिणाम क्रूड ऑइल आणि भारतात पेट्रोल-डिझेल दर कमी होण्यास होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.