नाशिक, 12 फेब्रुवारी: पुरवठा कमी झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर (Onion Price) दुप्पट झाले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला 25 ते 30 रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा आता काही शहरांमध्ये 60 रुपये किलोने विकला जात आहे. काही ठिकाणी याहीपेक्षा जास्त दर आहेत. राज्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या किंमतीवर विशेष परिणाम पहायला मिळतो आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे देखील कांदा महागला आहे. सामान्यांना कांदा आणखी काही काळ रडवणार आहे. तज्ज्ञांच्या मते मार्चनंतरच कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे, जेव्हा बाजारात नवा कांदा उपलब्ध होईल. देशातील सर्वात मोठी घाऊक कांदा बाजार असलेल्या लासलगाव एपीएमसीमध्ये (Lasalgaon APMC)गेल्या दहा दिवसांत कांद्याच्या घाऊक दरात 20% ने वाढ झाली आहे. लासलगाव एपीएमसीच्या अध्यक्षा सुवर्णा जगताप म्हणतात की, दक्षिण भारतीय बाजारपेठेतूनही कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. त्याचबरोबर गुजरात, मध्य प्रदेशातून फारसा पुरवठा होत नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारने जानेवारीत कांद्याची निर्यातही सुरू केली आहे, त्यामुळे त्यांच्या किंमतींमध्ये 1000 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. त्यांच्या मते, मार्च महिन्यात नवीन कांदा बाजारात येईल, त्यानंतर दर कमी होण्याची अपेक्षा आहे. (हे वाचा- Gold Price Today: आतापर्यंत 9000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, वाचा काय आहेत नवे दर ) देशातील महत्त्वाच्या शहरात कांद्याचे दर केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, 11 जानेवारी 2021 रोजी हैदराबादमध्ये एक किलो कांद्याची किंमत 34 रुपये होती, जी आता 26 रुपयांनी वाढून 60 रुपयांवर आली आहे. 11 जानेवारीच्या तुलनेत 11 फेब्रुवारी रोजी दिल्लीत कांद्याचे दर 19 रुपयांनी, मेरठमध्ये 20 रुपये, मुंबईत 14 रुपये शिलॉंगमध्ये 10 रुपयांनी वाढले आहेत. नाशिक, राजकोट, वारंगल, कोलकाता, नागपूर या काळात कांदा 15 रुपये प्रतिकिलोने महाग झाला आहे. (हे वाचा- ICICIच्या माजी CEO चंदा कोचर यांना जामीन,परवानगीशिवाय करता येणार नाही परदेशवारी) कांद्याचे दर वाढण्यामागे काय आहे कारण डिसेंबर 2020 आणि जानेवारी 2021 या कालावधीत राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, त्यामध्ये कांद्याची शेती खराब झाली आहे. परिणामी बाजारातील पुरवठा घटला आहे आणि त्याचा थेट परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे. देशातील बाजारात जवळपास 40 टक्क्याने हा पुरवठा कमी झाला आहे. आणखी एक कारण म्हणजे वाढलेले डिझेलचे दर, ज्याचा परिणाम कांद्याच्या वाहतुकीवर होतो आहे.