नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : कोराना काळामुळे सगळ्यांनाच व्यवसायाचं महत्त्व कळालं आहे. नोकऱ्या गेल्यामुळे अनेक जणांनी नवे व्यवसाय सुरू केले आहेत. अगदी भाजी विकण्यापासून ते एखाद्या कंपनीची फ्रेंचायजी घेण्यापर्यंतचे व्यवसाय लोक करत आहेत. अशाच एका व्यवसायातून मोठी कमाई करता येईल. अमूल (Amul India) ही भारतातील आघाडीची डेअरी कंपनी असून ती आपली फ्रेंचायजी देत आहे. यातून दरमहा चांगली कमाई करता येईल. 2 लाखांत सुरू हा नवा व्यवसाय - कोणतीही रॉयल्टी फी किंवा प्रॉफिट शेअरिंगव्यतिरिक्त तुम्हाला धंदा करता येईल. अमूल सध्या अशीच फ्रेंचायजी देत आहे. ही फ्रेंचायजी (Amul Dairy franchise) घेण्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपयांपासून 6 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. त्यातून तुम्हाला महिन्याला साधारणपणे 5 ते 10 लाख रुपयांची विक्री करून चांगला नफा कमवता येईल. अर्थात तुम्ही या फ्रेंचायजीसाठी दुकान कुठल्या भागात निवडता यालाही महत्त्व आहे. बाजारपेठेत, वर्दळीच्या ठिकाणी किंवा शाळा-कॉलेजच्याजवळ (Near School & College) तुम्ही जर हे अमूल पार्लर उघडलंत तर तुमची विक्री नक्की होणार. अशी घ्या अमूलची फ्रेंचायजी - अमूलच्या वतीने अमूल आउटलेट आणि अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियॉस्क अशा दोन प्रकारच्या फ्रेंचायजी दिल्या जात आहेत. तसंच अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायजीही दिली जात आहे. जर तुम्हाला पहिल्या प्रकारात गुंतवणूक करायची असेल म्हणजे अमूल आउटलेट (Amul Outlet), अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियॉस्क सुरू करायचं असेल, तर तुम्हाला 2 लाख रुपये द्यावे लागतील आणि जर तुम्ही अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर (Amul ice cream Scooping Parlour) सुरू करू इच्छित असाल, तर 5 लाख रुपयांची गुंतवणूक करणं गरजेचं आहे. यासाठी नॉन-रिफंडेबल सिक्युरिटी म्हणून 25 ते 50 हजार रुपये भरायला लागतील.
कमीशन - अमूल कंपनी प्रत्येक पदार्थाच्या एमआरपीवर कमीशन (Commission on MRP) देते. दुधाच्या एका पिशवीवर 2.5 टक्के, दुग्धजन्य उत्पादनाच्या एका पाउचवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमीशन कंपनी देते. अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायजी घेतली, तर रेसिपी बेस्ड आईस्क्रीम, मिल्कशेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंक या पदार्थांवर 50 टक्के कमीशन मिळतं. तसंच प्री-पॅक्ड आईस्क्रीमवर 20 टक्के, तर अमूलच्या उत्पादनांवर 10 टक्के कमीशन कंपनी देते. जागा - जर तुम्हाला अमूल आउटलेट सुरू करायचं असेल, तर तुम्हाला 150 स्क्वेअर फूट जागा घेणं आवश्यक आहे. या दुकानासाठी तुमची मालकीची (Own Space) किंवा भाड्याने घेतलेली जागा चालेल. अमूल पार्लरची फ्रेंचायजी घ्यायची असेल, तर किमान 300 स्क्वेअर फुटांची जागा असणं गरजेचं आहे.
असा करा अर्ज - तुम्हाला अमूल कंपनीची कुठल्याही प्रकारची फ्रेंचायजी घ्यायची असेल, तर तुम्ही retail@amul.coop या ई-मेल आयडीवर ई-मेल पाठवा. त्याचबरोबर http://amul.com/m/amul-scooping-parlours या लिंकवर जाऊन माहिती घेऊ शकता.