JOIN US
मराठी बातम्या / मनी / एका वेळी किती Credit Card असावेत? जाणून घ्या अधिक कार्ड्स असल्याचा फायदा आहे की तोटा

एका वेळी किती Credit Card असावेत? जाणून घ्या अधिक कार्ड्स असल्याचा फायदा आहे की तोटा

योग्य प्रकारे वापर केला तर क्रेडिट कार्डची सुविधा चांगली ठरते. नियोजनबद्ध पद्धतीने क्रेडिट कार्ड वापरलं गेलं नाही, तर वापरणारा मनुष्य आर्थिकदृष्ट्या खूप गोत्यातही येऊ शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 5 जुलै : क्रेडिट कार्ड (Credit Card) ही आधुनिक जगातली एक चांगली सुविधा आहे. अर्थात, योग्य प्रकारे वापर केला तरच ती सुविधा चांगली ठरते. व्यवस्थित, नियोजनबद्ध पद्धतीने क्रेडिट कार्ड वापरलं गेलं नाही, तर वापरणारा मनुष्य आर्थिकदृष्ट्या खूप गोत्यातही येऊ शकतो. क्रेडिट कार्डचा सर्वांत मोठा उपयोग म्हणजे साधारण 40 ते 50 दिवस पैसे बिनव्याजी (Interest Free) वापरता येतात. कुठल्या बँकेचं क्रेडिट कार्ड आहे, त्यानुसार आणि आपण कधी आणि कशा प्रकारे खर्च करतो, त्यावर हा कालावधी अवलंबून असतो, मात्र क्रेडिट कार्डचं बिल (Credit Card Bill) भरण्याची मुदत कधीही चुकवू नये. ती मुदत चुकवली तर त्यावर खूप मोठ्या दराने व्याज आकारलं जातं. वेळेत बिल न भरल्याचे प्रकार दोन-तीनदा घडले, तर तुमच्या सिबिल स्कोअरवरही (CIBIL Score) परिणाम होऊ शकतो. क्रेडिट कार्डवर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅकसारख्या ऑफर्स, तसंच ईएमआयवर खरेदी करण्याची सोय वगैरे अन्य सोयी झाल्या. त्याही योग्य पद्धतीने वापरल्या तर फायदेशीर असतात. या सगळ्या सुविधांमुळे अनेकांना असं वाटतं, की एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्स असली, तर या सगळ्या फायद्यांचा जास्त वापर करता येईल, पण जास्त कार्ड्स असणं फायदेशीर ठरतंच असं नाही. आपण कसा वापर करतो, यावरच फायदा अवलंबून आहे. तज्ज्ञ असं म्हणतात, की एका व्यक्तीकडे जास्तीत जास्त दोनच क्रेडिट कार्ड्स असावीत. अगदीच तुमच्या गरजा जास्त असतील, तर तीन क्रेडिट कार्ड्स ठेवू शकता, पण त्यापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्स ठेवणं अजिबात फायद्याचं ठरत नाही. कुटुंब चालवायचं म्हणजे खर्च आलेच. त्यात किराणा सामानापासून मुलांच्या वह्या-पुस्तकांपर्यंत आणि भाजीपाल्यापासून औषधं, सौंदर्यप्रसाधनं वगैरे सगळ्या प्रकारच्या खर्चांचा समावेश असतो. तुम्हाला वेगवेगळी क्रेडिट कार्ड्स वापरायची असली, तर तुमच्या नियमित घरखर्चासाठी एक क्रेडिट कार्ड राखून ठेवावं, असं या विषयातले तज्ज्ञ म्हणतात. त्याचं क्रेडिट लिमिटही तुमच्या मासिक घरखर्चाएवढंच ठेवावं. म्हणजे त्या लिमिटचा पुरेपूर वापर केलाच पाहिजे असं काही नाही. कमी वापर झाला तर चांगलंच, पण क्रेडिट लिमिट तुमच्या गरजेएवढंच असलं, तर बिल भरणं हे संकट वाटत नाही.

(वाचा -  दोन रुपयाचं हे नाणं करेल तुम्हाला लक्षाधीश, एका नाण्याच्या बदल्यात मिळतील 5 लाख )

किराणा सामान (Grocery), औषधं (Medicines), वैयक्तिक स्वच्छता आणि घराच्या स्वच्छतेसाठी लागणारं सामान, स्वयंपाकाचा गॅस आदींसाठी हे कार्ड वापरता येऊ शकतं. ऑनलाईन (Online Spents) किंवा ऑफलाईन (Offline Spents) अशा दोन्ही प्रकारे या कार्डचा वापर करता येऊ शकतो. आपल्या भागातल्या कोणत्या दुकानांमध्ये कार्ड वापरता येतं, तसंच आपण कोणत्या वस्तू ऑनलाईन खरेदी करतो, याचा विचार करून या कार्डचं लिमिट (Credit Limit) ठरवावं. हे सगळे खर्च कटाक्षाने या कार्डवरूनच करावेत, म्हणजे महिन्याच्या शेवटी एकत्रितपणे बिल भरणं सोपं जातं. तेवढा कालावधी पैसे बिनव्याजी वापरता येतात आणि रिवॉर्ड पॉइंट्सही (Reward Points) मिळतात. ते पॉइंट्स पुढच्या खरेदीवर सवलत मिळवण्यासाठी वापरता येतात. दुसरं क्रेडिट कार्ड हवं असेल, तर ते इमर्जन्सी (Emergency Spents) अर्थात आपत्कालीन खर्चांसाठी राखीव ठेवावं. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची इमर्जन्सी उद्भवू शकते. घरातल्या कोणाचा दुर्दैवी अपघात होऊ शकतो किंवा अचानक मोठं आजारपणे उद्भवू शकतं. घराच्या किंवा कारच्या किंवा कशाच्याही मेन्टेनन्सचा खर्च अचानक येऊ शकतो. अशा आणीबाणीच्या परिस्थितीतच हे दुसरं कार्ड वापरावं. इतरवेळी कटाक्षाने या कार्डचा वापर करू नये. या दुसऱ्या कार्डला अ‍ॅड ऑन कार्डही ठेवावं. म्हणजे पती-पत्नी अशा दोघांनाही अडचणीच्या वेळेत ते वापरता येईल. या कार्डवरून इमर्जन्सीसाठी केलेला खर्च भागवण्यासाठी क्रेडिट लिमिटचा वापर करून घेता येतो. क्रेडिट लिमिटच्या कालावधीत आपण तेवढे पैसे गोळा करू शकतो.

(वाचा -  5 हजारांची गुंतवणूक ते 34 हजार कोटींचे मालक; राकेश झुनझुनवाला यांचा प्रवास )

या दोन कार्ड्सपेक्षा आणखीही तिसरं कार्ड हवं, असं तुम्हाला वाटत असेल, तर ते कार्ड तुमच्या छंदांसाठी किंवा मौजमजेच्या खर्चासाठी (Lifestyle Spents) राखीव ठेवावं. पर्यटन, आउटिंग, हॉटेलिंग, सिनेमे पाहणं वगैरेंचे खर्च त्या कार्डवरूनच करावेत. एकाच प्रकारचे खर्च यावरून केले जाणार असतील, तर त्या गरजेनुसार विशिष्ट कार्डही घेता येतं. त्यावर ऑफर्स आणि डिस्काउंटची सोयही त्यानुसार असते. सगळ्या गरजांसाठीची क्रेडिट कार्ड्स वेगवेगळी असली, तर पैशांचं नियोजन, व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या