लोन ट्रान्सफर करण्याचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का? समजून घ्या प्रक्रिया अन् आवश्यक कागदपत्रे
मुंबई**, 22** नोव्हेंबर: कार, घर खरेदी, घरदुरुस्ती, मुला-मुलींचे विवाह आदी कोणत्याही कारणासाठी तातडीची आर्थिक मदत म्हणून कर्जाचा पर्याय निवडला जातो. कर्जाची परतफेड व्याजासह करावी लागते. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचं कर्ज घेताना सर्वप्रथम व्याजदराचा विचार केला जातो. बऱ्याचदा विविध बॅंकांच्या कर्ज योजना, व्याजदर यांविषयी सखोल माहिती घेण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने तातडीने निर्णय घेऊन एखाद्या बॅंकेची निवड करून कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाते; पण कालांतराने कर्जाची परतफेड करताना बॅंकेच्या अटी, नियम जाचक वाटू शकतात. व्याजदर जास्त असल्यासही त्रस्त व्हायला होतं आणि दुसऱ्या एखाद्या बॅंकेत कर्ज ट्रान्स्फर करण्याचा विचार सुरू होतो. कर्ज ट्रान्स्फर करण्याचे काही फायदे असतात. कमी व्याजदर असलेल्या बॅंकेत कर्ज ट्रान्स्फर केल्यास निश्चितच आर्थिक भार कमी होतो. या प्रक्रियेसाठी काही कागदपत्रं गरजेची असतात. लोन ट्रान्सफरसाठी या कागदपत्रांची आवश्यकता: कर्ज ट्रान्स्फर करण्याचा निर्णय झाल्यानंतर सर्वप्रथम इतर बॅंकांचे व्याजदर, कर्ज योजना आणि त्यासंबंधी अटी, शर्ती, ट्रान्स्फरसाठी आवश्यक कागदपत्रं यांची माहिती घ्यावी. सर्वसामान्यपणे कर्ज ट्रान्स्फर करण्यासाठी संपूर्ण माहिती भरलेला अर्ज, पासपोर्ट साइज फोटो, ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड, आधार कार्ड, व्होटर कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांपैकी एक), वयाचा पुरावा (पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, व्होटर कार्ड, आधार कार्ड), पॅन कार्डची कॉपी, रहिवासी पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, पासपोर्ट, लॅंडलाइन बिल, अलीकडचं वीजबिल किंवा रेंट अॅग्रीमेंट), गेल्या सहा महिन्यांचं बॅंक स्टेटमेंट, तीन महिन्यांची सॅलरी स्लिप, व्यावसायिक असल्यास बिझनेस पॅन कार्ड, व्यवसायाच्या ठिकाणचा पत्ता आणि त्याचा पुरावा, व्यवसायाची गेल्या तीन महिन्यांचा नफा-तोटा दर्शवणारी बॅलन्सशीट, सध्या घेतलेल्या कर्जाची कागदपत्रं, रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड यांसह नवीन बॅंकेच्या नियमानुसार आवश्यक कागदपत्रं आवश्यक असतात. हेही वाचा: ट्विटर, इन्स्टानंतर आता मेटाचा दणका! तब्बल 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना एका क्षणात काढलं कर्ज ट्रान्स्फर करण्याचे काही फायदे आहेत. कर्ज ट्रान्स्फर केल्याने व्याजदर तुलनेनं कमी होतो. परिणामी व्याजावरचा खर्च कमी होतो. नव्या कर्ज योजनेअंतर्गत काही फायदे मिळतात. फी आणि चार्जेस कमी असतात. गरजेनुसार कर्ज परतफेडीसाठी कालावधी निवडण्याची सुविधा मिळते.
कर्ज ट्रान्स्फर केल्यास ईएमआय कमी होऊ शकतो आणि कर्जाचा कालावधी तसाच राहू शकतो किंवा यामुळे तुमचा ईएमआय तसाच राहू शकतो; पण कर्जाचा कालावधी कमी होऊ शकतो. कर्ज परतफेडीसाठी दीर्घ कालावधीची निवड केल्यास साहजिकच ईएमआयचं ओझं कमी होतं; पण याचा व्याजावर परिणाम होऊ शकतो. कर्ज परतफेडीसाठी चांगले पर्याय मिळू शकतात. यामुळे एकूणच कर्जाचा खर्च कमी होण्यास मदत होते.