शांघाय, 02 फेब्रुवारी: चिनी गुंतवणुकदारांनी (Chinese Investors) सोमवारी चांदी (Silver) खरेदीचा सपाटा लावल्यानं शांघाय कमोडीटी बाजारात (Shanghai Market) चांदीच्या भावात प्रचंड वाढ पहायला मिळाली. सप्टेंबरनंतर प्रथमच सोमवारी चांदीचा भाव सर्वात उच्चांकी पातळीवर पोहोचला. जागतिक पातळीवरील किरकोळ गुंतवणूकदारांनीही (Retail Investors) चांदीत गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिल्यानं चांदीत अभूतपूर्व तेजी दिसून आली. केवळ कमोडीटी एक्स्चेंजवरच नव्हे, तर चांदीशी संबधित कंपन्यांचे शेअर्स आणि फंडामध्येही गुंतवणूक वाढली आहे, असं रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीचा दर कमी असल्यानं सर्वसामान्य गुंतवणूकदारांची पसंती चांदीला असते. त्यामुळं चांदीला गरीबांचे सोनं असं म्हटलं जातं. सध्या या गरीबांच्या सोन्याला चांगलीच मागणी आली आहे. चांदीतील अचानक आलेल्या या तेजीला सोशल मीडीयावरील (Social Media) चर्चा कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे. नुकतीच रेडीट (Reddit) आणि इतर सोशल मीडियामुळं अमेरिकेतील व्हिडिओ गेम कंपनी गेमस्टॉप कार्पोरेशनच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली होती, त्यामुळं या शेअरनं जगभरातील गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तसंच आता चांदीच्याबाबत झालं आहे. (हे वाचा- EXCLUSIVE : बँकांच्या खासगीकरणावर काय म्हणाल्या निर्मला सीतारामन? ) गेल्या आठवड्यापासून रेडीटवर चांदीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याची शिफारस करण्यात येत आहे, त्यामुळं आघाडीच्या चीनी गुंतवणूकदारांसह सर्वसामान्य गुंतवणूकदारांनीही आपला पैसा चांदीकडं वळवला आहे. परिणामस्वरूप शांघाय फ्युचर्स एक्स्चेंजवर चांदीचा भाव सोमवारी प्रती किलोग्राम 9.27 टक्क्यांनी वाढून 5 हजार 939 युआनवर बंद झाला. शेंगदा रिसोर्सेस को. लि., इनर मोंगोलिया झिंगये को. लि. अशा चीनमधील चांदी खाण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव सोमवारी चांगलेच वधारले, तर युबीएस एसडीआयसी सिल्व्हर फ्युचर्स फंडमध्ये 8.7 टक्के वाढ नोंदवण्यात आली. शांघाय गोल्ड एक्स्चेंजवर सोन्याच्या दरातही गेल्या चार महिन्यातील उच्चांकी वाढ झाली. सोमवारी दुपारी बाजार बंद होण्यापूर्वी सोन्याच्या दरात 9.4 टक्के वाढ होउन प्रती किलोग्राम तो 5 हजार 890 युआन इतका नोंदवला गेला. (हे वाचा- News18 Exclusive: सुधारणांसाठी तयार, पाहा कृषी कायद्यांबाबत काय म्हणाल्या अर्थमंत्री?) चांदीत अचानक आलेली ही तेजी एक ‘Bubble’ ठरण्याची भीतीही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. फंडामेंटल्सच्या आधारावर चांदीत अल्पकाळासाठी फार मोठी वाढ अपेक्षित नाही, मात्र दीर्घकाळ गुंतवणूक करण्याबाबत लोकांची मानसिकता पक्की आहे, त्यामुळं बाजारातील तेजीचा कल अद्याप कायम असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी असली तरी ही तेजी अशीच सुरू राहिली, तर एका क्षणी बाजार कोसळेल आणि त्याचा फटका किरकोळ गुंतवणूकदारांना बसेल अशी भीती वाईबो या संकेतस्थळावर व्यक्त करण्यात आली आहे.