Gold rate
मुंबई,22 ऑक्टोबर : दिवाळी ला सुरुवात झाली आहे. दिवाळी म्हटलं, की नवीन वस्तू, सोनं-चांदी खरेदीकडे कल असतो. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बहुतांश जण सोनं खरेदीला प्राधान्य देतात. सणासुदीमुळे खरेदीसाठी बाजार गर्दीने फुलून गेलेला असतो. सराफा बाजारही याला अपवाद नसतो. त्यामुळे गर्दीत सोनं-चांदी खरेदी करताना अनेक अडचणी येऊ शकतात. तसंच या कालावधीत गर्दीमुळे चोरीचं भयदेखील असतं. या पार्श्वभूमीवर अलीकडच्या काळात सोनं खरेदीसाठी एक खास पर्याय ग्राहकांना उपलब्ध झाला आहे. तुम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. हा पर्याय दिवसेंदिवस जास्त लोकप्रिय होत आहे. डिजिटल गोल्ड खरेदीची खास प्रक्रिया असते. या प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही अगदी कमीत कमी एका रुपयाची गुंतवणूक करूनही हे व्हर्च्युअल सोनं खरेदी करू शकता. `इंडिया न्यूज`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. भारतासह जगभरातल्या अनेक देशांमध्ये सोन्यात गुंतवणूक करणं सुरक्षित आणि फायदेशीर मानलं जातं. मार्केट अस्थिर असेल तर ही गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. सोन्याची किंमत वाढली की इतर सिक्युरिटीजच्या किमती कमी होतात. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेक जण सोनं खरेदी करतात. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जाते; पण सणासुदीमुळे बाजार गर्दीने फुलून जातो. अशा स्थितीत सोनं खरेदी काहीशी अवघड ठरू शकते. यावर ऑनलाइन अर्थात डिजिटल गोल्ड खरेदी हा सर्वोत्तम पर्याय आहे. दिवसेंदिवस गुंतवणुकीच्या पद्धती बदलत आहेत. अशा स्थितीत साहजिकच डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. ऑनलाइन किंवा यूपीआयच्या माध्यमातून डिजिटल सोनं खरेदी करता येते. विक्रेता व्यवहारासाठी एक डिजिटल चलन जारी करतो. तुम्ही ज्या कंपनीकडून डिजिटल सोनं खरेदी करता, ती कंपनी ते सोनं त्यांच्या तिजोरीत ठेवते. हेही वाचा - आता तुम्ही घरबसल्या तुमच्या सोन्यावर भाडे मिळवू शकता; संपूर्ण प्रक्रिया आणि जोखीम पाहा डिजिटल सोन्यातली गुंतवणूक तुम्ही एक रुपयापासून सुरू करू शकता. अगदी घरबसल्या आरामात तुम्ही डिजिटल सोनं खरेदी किंवा विक्री करू शकता. यामुळे कोणत्याही अडचणींविना तुम्हाला तात्काळ पैसे मिळतात. बहुतांश प्लॅटफॉर्म्सवर डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत मर्यादा आहे. या प्लॅटफॉर्म्सवरून तुम्ही एका क्लिकवर डिजिटल सोनं खरेदी करू शकता. डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीसाठी तीन पद्धती उपलब्ध आहेत. सॉव्हरीन गोल्ड बॉंड हा त्यापैकीच एक होय. सॉव्हरीन गोल्ड बॉंड ही सरकार समर्थित सिक्युरिटी आहे. त्यांची किंमत सोन्याच्या वजनानुसार असते. यात एक ग्रॅम सोनं हे बॉंडच्या एक युनिटच्या बरोबरीचं असतं. या बॉंडमधली गुंतवणूक सोन्याच्या किमतीवर आधारित असते. या बॉंडची इश्यू किंमत खरेदीवेळी भरावी लागते. मॅच्युरिटीवेळी याची रक्कम रोखीने दिली जाते. गोल्ड ईटीएफ भौतिक सोन्याचा वापर करून मोजलं जातं. हे कस्टोडियन बॅंकांच्या तिजोरीत ठेवलं जातं. मालमत्तेचं व्यवस्थापन करणारी कंपनी प्रत्येक युनिटला एक ग्रॅम सोन्याचं मूल्य कसं वाटप करण्याचा निर्णय घेते यावर ईटीएफच्या प्रत्येक युनिटचं मूल्य अवलंबून असतं.
गोल्ड फंड गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करतात. हा म्युच्युअल फंडसारखा एक प्रकार आहे. निव्वळ मालमत्ता मूल्य रोज ट्रेडिंगच्या शेवटी घोषित केलं जातं. डॉलर आणि महागाईमुळे शेअर बाजार आणि रुपयावरचा वाढता दबाव यामुळे गुंतवणूकदारांनी आपला पैसा सोन्यात गुंतवण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या काळात सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एकूण प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करण्यासोबत डिजिटल गोल्डमध्ये पैसे गुंतवण्याची पद्धत लोकप्रिय होत आहे.