नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : येत्या काही महिन्यांत नवजात बालकांच्या आधार नोंदणीची व्याप्ती देशातील सर्व राज्यांमध्ये वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. त्यानंतर नवजात मुलाचे आधार कार्ड त्याच्या जन्म प्रमाणपत्रासह देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध होईल. सध्या भारतातील 16 राज्यांमध्ये आधारशी जोडलेली जन्म नोंदणी आहे जी नवजात बालकांची नोंदणी सुलभ करत आहे. ही प्रक्रिया सुरू होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. यादरम्यान अनेक राज्यांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली. आता ही सुविधा सर्व राज्यांमध्ये पोहोचवण्याचा सरकारचा विचार आहे. आधार क्रमांक जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने म्हटले आहे की, उर्वरित राज्यांमध्ये जन्म प्रमाणपत्रासह आधार कार्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. येत्या काही महिन्यांत ही सुविधा सर्व राज्यांमध्ये सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. जेव्हा मुलाचे जन्म प्रमाणपत्र जारी केले जाते, तेव्हा एक संदेश UIDAI प्रणालीवर पोहोचतो आणि आधार नोंदणी आयडी क्रमांक तयार होतो. नंतर मुलाचा फोटो आणि पत्ता असलेले आधार कार्डही दिले जाते. अनेक प्रकरणांमध्ये, आधार नोंदणीची जबाबदारी फक्त जन्म निबंधकाची असते. मुलांचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत वास्तविक, आधार कार्डसाठी 5 वर्षांपर्यंतच्या मुलांचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत. त्यांच्या UID वर त्यांच्या पालकांच्या UID माहिती आणि छायाचित्राच्या आधारे प्रक्रिया केली जाते. मूल 15 वर्षांचे झाल्यावर त्याचे बायोमेट्रिक अपडेट (दहा बोटे, बुबुळ आणि चेहऱ्याचा फोटो) केले जाते. वाचा - आमच्याकडे पैसे ठेवा, मिळणार सर्वाधिक व्याज; नामांकीत बँकेचा ग्राहकांना SMS 134 कोटी आधार कार्ड जारी आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक कागदपत्र आहे. 1,000 हून अधिक राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचे लाभ आधार कार्डद्वारे दिले जातात. यापैकी सुमारे 650 योजना राज्य सरकार चालवतात, तर 315 योजना केंद्र सरकार चालवतात आणि सर्व आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरतात. जन्माच्या वेळी जन्म प्रमाणपत्रासोबत आधार कार्ड जारी केले जावे, हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. UIDAI या संदर्भात भारताच्या रजिस्ट्रार जनरलसोबत काम करत आहे. प्रक्रियेसाठी जन्म नोंदणीसाठी संगणकीकृत प्रणाली आवश्यक आहे.