नवी दिल्ली, 23 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा Why I Killed Gandhi हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा चित्रपट 30 जानेवारीला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असला तरी आज ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या निर्मात्या कल्याणी सिंह (Kalyani Singh) यांनी हा चित्रपट आधी पाहण्याचा सल्ला दिला आहे. कल्याणी सिंह यांनी ‘न्यूज 18 लोकमत’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी टीका करणाऱ्यांना आधी चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. ‘जे घडलंय तेच आम्ही दाखवलंय’ “जे लोक वादविवाद करत आहेत मी त्यांना विनंती करते की, तुम्ही आधी हा चित्रपट बघा. चित्रपट बघितल्यानंतर टीका-टीप्पणी करावी असं वाटत असेल तेव्हा नक्कीच तसं करा. मी त्यासाठी रोखू शकत नाही. कारण आपल्या देशाच्या संविधानानुसार प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. 2017-18 मध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला. त्यावेळी आम्हाला काही गोष्टी मिळत नव्हत्या. त्या गोष्टी BBC कडे होत्या. त्या गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला घ्यायच्या होत्या. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यात वेळ झाला. ज्या गोष्टी खरंच घडल्या आहेत त्याच गोष्टी आम्ही दाखवल्या आहेत. कोर्टचा जो सीन आहेत त्या गोष्टी जश्याच्या तशा आहेत. ज्या गोष्टी नथुराम गोडेसे म्हणाला होता त्याच गोष्टी अमोल कोल्हे यांनी सांगितल्या आहेत. त्यामध्ये आम्ही काहीच वेगळं टाकलेलं नाही. जे घडलेलं आहे तेच आम्ही दाखवलेलं आहे”, असं कल्याण सिंह यांनी सांगितलं. ( ‘एक चुम्मा’ गाण्यावर लग्नात डान्स करीत होता तरुण; अचानक खाली कोसळला, उठलाच नाही! ) राष्ट्रवादीच्या विचारधारेकडे कसं बघता? “मी आणि माझ्या पतीने खरं लोकांसमोर आणण्यासाठी हा चित्रपट बनवला आहे. चित्रपटाचा प्रदर्शन हे 30 जानेवारीला होणार होतं. पण ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि मतावर मी काहीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. कारण मला राजकारणाचं जास्त ज्ञान नाही. मी एक चित्रपट कलाकार आहे. मी स्वत: चित्रपट लिहिते. आम्ही कलाकार आहोत. आम्ही नेहमी खरं आणि चांगलं जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. नथुराम गोडसेची कोर्टातील सुनावणी लोकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘महाराष्ट्रात मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक प्रचंड गाजलं होतं. त्यावेळी तर असं काही झालं नव्हतं. पण आज का हे होतंय? हे मला कळत नाहीय. त्यांनीदेखील तेच दाखवलं आहे”, अशी प्रतिक्रिया कल्याणी सिंह यांनी दिली. नथुरामच्या भूमिकेसाठी अमोल कोल्हेंचीच निवड का केली? “आम्हाला नथुराम गोडसेच्या भूमिकेसाठी मराठीचं चांगलं डिक्शन असणाऱ्या कलाकाराची गरज होती. त्याचबरोबर त्या कलाकाराला नाटकात काम करण्याचा अनुभव असावं, असाही आमचा विचार होता. कारण नाटकात आपण प्रवाहात बोलत जातो. नथुराम गोडसेच्या कोर्टातील घडणाऱ्या घडामोडींसाठी त्याची गरज होती. त्याचमुळे आमचं कोल्हे यांच्याकडे लक्ष गेलं. अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून त्या भूमिकेला खूप चांगल्या पद्धतीने जीवंत केलं होतं”, असं कल्याणी सिंह म्हणाल्या. “भूमिकेवरुन वाद होईल, अशी कोणतीच चर्चा झाली नव्हती. जे चित्रपटात दाखवलं गेलंय ते याआधीच सर्वांसमोर येऊन गेलेलं आहे. खरंतर ज्यावेळी त्यांना या प्रकारची भूमिका मिळाली तेव्हा त्यांना आनंद झालेला होता. दुसरीकडे गोडसेने गांधींना का मारलं ते कोर्टात सांगितलं होतं. तोच सीन आहे. जे विरोध करत आहेत त्यांनी कृपया आधी चित्रपट बघावा”, असंदेखील त्या म्हणाल्या. ‘आम्ही अमोल कोल्हेंसोबत’ “सध्याच्या परिस्थितीत काय करावं हे अमोल कोल्हे यांचा स्वत:चा निर्णय असेल. पण मला अमोल कोल्हे यांच्यासोबत काय करायला पाहिजे विचारत असाल तर मी आणि माझे पती प्रत्येक पावलावर अमोल कोल्हे यांच्यासोबत आहे. जिथे त्यांना आमची गरज पडेल तिथे आम्ही त्यांच्या फक्त एका आवाजात उजव्या-डाव्या बाजूला उभे राहू. पण शेवटी अमोल कोल्हे यांचा निर्णय असेल की, काय करावं. टीका करणाऱ्या सर्व नेत्यांना विनंती करते की, आधी चित्रपट बघा”, अशी भूमिका त्यांनी मांडली.