पुणे, 31 मे: महाराष्ट्रात अद्याप मान्सूनचं आगमन (Monsoon in Maharashtra) झालं नाही. तोपर्यंतचं राज्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसानं (Pre-Monsoon Rain) जोर धरला आहे. काल पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांना पूर्वमोसमी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. या पावसात अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या संपूर्ण बागेवरचं कोयता फिरवावा लागला आहे. राज्यात मान्सूनच्या आगमनाला अद्याप काही आठवडे बाकी असताना राज्यात पावसाळ्याची स्थिती निर्माण झाली आहे. बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा सरासरी तापमानाच्या खाली घसरला आहे. त्यामुळे राज्यात एकंदरीत पावसाळा ऋतुचा अनुभव येत आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, पुढील 3 ते 4 तासांत पुण्यासह सातारा, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, बीड, परभणी हिंगोली आणि अहमदनगर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
मुंबईकरांना देखील हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस राज्यात मुंबईसह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह आणि विदर्भात पूर्व मोसमी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे. हे ही वाचा- पुण्यातील विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी; विकसित केलं जागतिक दर्जाचं ‘Oxygen Concentrator’ केरळात मान्सून उशीरा दाखल होणार हवामान खात्याच्या जुन्या अंदाजानुसार, आज केरळात मान्सून दाखल होणं अपेक्षित होतं. अंदमान निकोबार बेटांत वेळेवर मान्सून दाखल झाला असला तरी केरळात मान्सून दाखल होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. हवामान खात्याच्या अद्ययावत माहितीनुसार, 3 जूनपर्यंत केरळात मान्सून दाखल होणार आहे. तर पुढील दोन आठवड्यात महाराष्ट्रातही नैऋत्य मोसमी वाऱ्याचं आगमन होणार आहे.