यवतमाळ, 16 मार्च : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील झरी तालुक्यातील बंदी वाढोना या भागात शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या तीन शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने हल्ला (Tiger attack) केल्याची घटना समोर आली आहे. यात तिघेही गंभीर जखमी झालेआहे. या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या तिन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Yavatmal, Three farmers seriously injured in tiger attack) पैकू मडावी, प्रकाश आत्राम, अजय आत्राम हे तिघे जण आपल्या शेतात कामासाठी जात असताना गावा शेजारच्या शेतातील ज्वारीच्या पिकात असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात तिघेही जखमी झाले आहेत. आपला बचाव करण्यासाठी या तिघांनी आरडाओरड केली, त्यानंतर गावातील नागरिक आवाजाच्या दिशेने लाठ्या काठ्या शेतात पोहचले. त्यानंतरही वाघ शेतालगत एका पाईपमध्ये बसून होता. गावकऱ्यांनी वाघाच्या दिशेने धाव घेतलाी, तेव्हा वाघ पळून गेला. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर अधिकाऱ्यांचा चमू दाखल झाला आणि जखमींना पांढरकवडा व नंतर यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा मुक्त संचार आहे. त्यामुळे या परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. झरी आणि पाटण बोरी हा परिसर आदिवासी बहुल आहे. बहुतांश लोकांचा शेती व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांना शेती शिवाय पर्याय नाही. हे ही वाचा- Solapur News : मुद्यावरुन थेट गुद्यावर, विरोधकांकडून सरपंचाला बेदम मारहाण मात्र अलीकडे या भागात पट्टेदार वाघांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील एका शेतात वाघाने दोन बैलांवर हल्ला करून त्यांना ठार केले होते. तर पाटण बोरी शिवारातील एका शेतात शेतकऱ्यावर हल्ला केला होता. तेव्हापासून नागरिकांमध्ये वाघाबद्दल प्रचंड दहशत पसरली आहे. या घटनेच्या वेळी संतप्त जमावाने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेराव सुद्धा घातला होता. आणि तेव्हा पासून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. भविष्यात ग्रामस्थ आणि वन्य प्राणी यांच्यात संघर्ष होण्याची भिती निर्माण झाली आहे.