सातारा, 13 जून: पुण्यातील (Pune) येरवडा तुरुंगात (Yerwada Jail) शिक्षा भोगत असताना एका कैद्याने कपडे धुवायला लावल्याच्या बदला (Revenge) तरुणाने बाहेर आल्यावर घेतला आहे. येरवडा तुरुंगात पाय दाबायला लावणे, कपडे धुवायला देणे, अशी कामं सांगितल्यामुळे एका तरुणाने पुरंदरमधील (Purandar) एका व्यक्तीचा निर्घृण खून (Brutal murder) केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक (Arrest) केली असून एक साथीदार अद्याप फरार आहे. याप्रकरणाचा पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत. हत्या झालेल्या 35 वर्षीय युवकाचं नाव मंगेश सुरेंद्र पोम असून तो पुरंदर तालुक्यातील पोमणनगर येथील रहिवासी आहे. तर अटक केलेल्या आरोपीचं नाव वैभव सुभाष जगताप (वय-28) असून तो पुरंदर तालुक्यातील पांगारे येथील रहिवासी आहे. या हत्येतील अन्य एक आरोपी ऋषीकेश दत्तात्रय पायगुडे अद्याप फरार असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. या दोघांनी मिळून मंगेश पोमची हत्या केली आहे. मृत मंगेश पोम काही दिवसांपूर्वी एका गंभीर गुन्ह्यांत पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. याच दरम्यान आरोपी वैभवही एका गुन्ह्यात तुरुंगात शिक्षा भोगायला आला होता. दरम्यान मृत मंगेशने आरोपी वैभवला पाय दाबायला लावणे, कपडे धुवायला देणे अशी कामं लावली होती. यानंतर काही दिवसांनी दोघंही शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आले होते. हे ही वाचा- अल्पवयीन मुलीनं मित्राच्या मदतीनं लांबवलं 16 तोळे सोनं; फिल्मी स्टाईलनं अटक दरम्यान आरोपी वैभवने आपला साथीदार ऋषीकेश दत्तात्रय पायगुडे याच्या साथीने मंगेश पोमची निर्घृण हत्या केली आहे. यानंतर आरोपींनी मंगेशचा मृतदेह खंडाळा तालुक्यातील वाठार बुद्रुक गावच्या हद्दीत टाकला होता. या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. आरोपी वैभव आणि ऋषीकेश हे पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांच्या नोंदी आहे. या घटनेचा पुढील तपास लोणंद पोलीस करत असून आरोपी ऋषीकेशचा शोध घेतला जात आहे.