वसईतल्या स्फोटाने तिघांचा जीव घेतला, सात जणांची रुग्णालयात झुंज सुरु
पालघर, 28 सप्टेंबर : वसईत आज मोठी दुर्घटना घडली आहे. वसई पूर्वेच्या जुचंद्र वाकीपाडा येथील कॉस पावर कंपनीत नायट्रोजन सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सात कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही दुर्घटना अतिशय भयानक होती. सर्व जखींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. कंपनीतील यंत्राच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना हा अपघात घडल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे. वाकीपाडा येथे झालेला स्फोट हा खूप मोठा होता. या स्फोटामुळे परिसराला मोठा हादरा बसला होता. हा स्फोट इतका भयानक होता की एक किलोमीटर दूरपर्यंत स्फोटाचा आवाज गेला. या आवाजामुळे परिसरातील नागरीक भयभीत झाले होते. नेमकं काय घडलं ते कुणाच्याच लक्षात येत नव्हतं. सुरुवातील आग लागल्याचं बोललं जात होतं. नंतर कंपनीत स्फोट झाल्याचं उघड झालं. ( मुंबई कस्टम विभागाची मोठी कारवाई, चॉकलेटमधून तब्बल 19 लाखांची सोन्याची तस्करी ) वाकीपाडा येथील कंपनीत स्फोट झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. स्फोटानंतर धुराचे मोठमोठे लोळ आकाशात जाताना दिसत होते. स्फोटानंतर तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच घटनास्थळी अग्निशन दलाचे जवान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु होते. पण या दुर्घटनेत तीन कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस या प्रकरणी सखोल चौकशी करत आहेत.