मुंबई, 14 जानेवारी : नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमदेवारी देण्यात आली होती. मात्र सुधीर तांबे यांनी ऐनवेळी आपला मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी माघार घेतली आणि सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेस आक्रमक झाले असून, आम्ही तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचं पटोले यांनी जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे नाशिकची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याची भूमिका ठाकरे गटाकडून घेण्यात आली आहे. मातोश्रीवर बैठक ठाकरे गट आता नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत मातोश्रीवर तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सुरू असलेल्या या बैठकीमध्ये संजय राऊत, सुभाष देसाई यांची देखील उपस्थिती आहे. या बैठकीला स्वत: अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या देखील उपस्थित आहेत. नाशिक निवडणुकीत ठाकरे गटाची काय भूमिका असावी यावर या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे. हेही वाचा : सत्यजित तांबेंना भाजप पाठिंबा देणार का? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं भाजपाची भूमिका दरम्यान अद्यापपर्यंत सत्यजित तांबे यांनी आमच्याकडे पाठिंबा मागितलेला नाही. तांबेंकडून पाठिंब्याचा प्रस्तावर आल्यास त्यावर पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटाने जर शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यास मविआमधील इतर घटक पक्षदेखील त्यांना पाठिंबा देणार का? हे पहावं लागणार आहे.