JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दिव्यशक्ती सिद्ध करून दाखवा; रामकथेसाठी आलेल्या धीरेंद्र महाराजांना श्याम मानव यांचे चॅलेंज

दिव्यशक्ती सिद्ध करून दाखवा; रामकथेसाठी आलेल्या धीरेंद्र महाराजांना श्याम मानव यांचे चॅलेंज

धीरेंद्र महाराजांनी जर दिव्यशक्ती सिद्ध केली तर तर मी त्यांच्या पाया पडेन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम बंद करू असंही श्याम मानव यांनी म्हटलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 24 जानेवारी : रामकथा प्रवचनासाठी धीरेंद्र कृष्णजी महाराज हे सध्या नागपूरमध्ये आले आहेत. दरम्यान, त्यांच्याविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि राष्ट्रीय संघटक श्याम मानव यांनी केली आहे. रामकथा प्रवचन कऱण्याचा धीरेंद्र यांना अधिकार आहे, मात्र रामकथेच्या नावावर दिव्य दरबार आणि प्रेत दरबार आयोजित करत आहेत. त्यांचे दिव्यशक्तीचे दावे आणि प्रयोग हे महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यानुसार आणि ड्रग्ज अँड मॅझिक रिमेडिस अॅक्टनुसार गुन्हेगारी कृत्य आहे. त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करून दाखवावी आणि ३० लाख रुपयांचे पुरस्कार मिळवा असं थेट आव्हान प्राध्यापक श्याम मानव यांनी दिलं आहे. राज्य सरकारच्या जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे श्याम मानव हे सहअध्यक्ष आहेत. या कायद्यानुसार कारवाईचे अधिकार असणाऱ्या प्रमुख दक्षता अधिकारी आणि सहायक पोलीस आय़ुक्त (गुन्हे) यांच्याकडे महाराजांच्या गुन्ह्याबाबत तपशील सादर केला असल्याची माहिती प्राध्यापक श्याम मानव यांनी दिली. हेही वाचा :  नागपुरातील नवसाला पावणारा गणपती! टेकडी फोडताच मिळाली होती मूर्ती, पाहा Photos श्याम मानव म्हणाले की, आजपर्यंत कुणीही दिव्यशक्ती सिद्ध केलेली नाही. महाराज जर दिव्यशक्ती सिद्ध करू शकत असतील तर चांगली गोष्ट आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आव्हान त्यांनी स्वीकारावं आणि ३० लाख रुपयांचे बक्षीस जिंकावं. महाराजांना ही रक्कम जर लहान वाटत असेल तर त्यांनी पैशासाठी नाही तर किमान त्यांची दिव्यशक्ती लोकांसमोर दाखवून जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तरी ती सिद्ध करावी. धीरेंद्र महाराजांनी जर दिव्यशक्ती सिद्ध केली तर तर मी त्यांच्या पाया पडेन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम बंद करू. देव-धर्माला विरोध नाही, मात्र देवाच्या नावावर जनतेची लूट आणि फसवणूक होत असेल तर लोकांना सावध करणं आणि लोकांचं प्रबोधन करणं हे समितीचं कर्तव्य असल्याचंही श्याम मानव यांनी सांगितलं. हेही वाचा :  भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का? मु्ख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बॅनरबाजी नागपूरमध्ये रामकथेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा उपस्थित होते. याबाबत श्याम मानव यांना विचारले असता त्यांनी म्हटलं की, रामकथेले ते तिकडे गेले असतील. पण त्यांनी इथं लोकांची फसवणूक होतेय याची कल्पना नसावी. फडणवीस आणि गडकरी यांनी जादूटोणा कायदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकांच्या फसवणुकीचं समर्थन ते करणार नाहीत असंही श्याम मानव म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या