बारामती, 9 ऑक्टोबर : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे, तसंच दोन्ही गटांना निकाल येईपर्यंत शिवसेना हे नावही वापरण्यात येणार नाही. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि पक्षचिन्ह धनुष्यबाणाबद्दल दिलेला निर्णय अपेक्षित नव्हता. सर्वोच्च न्यायालयात 16 जणांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी सुरु असताना निवडणूक आयोगाने दिलेला निकाल धक्कादायक असल्याची भूमिका, उद्धव ठाकरे यांनी मांडली. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी हा निकाल अपेक्षित नसल्याची प्रतिक्रिया दिलेली असतानाच महाविकासआघाडीचे महत्त्वाचे नेते असलेल्या अजित पवार यांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार यांना असा निकाल येईल, असं वाटलं होतं. बारामतीमध्य पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ‘असा निकाल येईल, असं वाटलंच होतं. मागचे निकाल पाहता बैलजोडीच्या वेळी सिंडिकेट-इंडिकेट झालं, त्यावेळी बैलजोडी गोठवून दुसरं चिन्ह दिलं. त्यानंत गाय-वासरू गोठवून पंजा आणि राष्ट्रवादीला घड्याळ असं चिन्ह दिलं,’ असं अजित पवार म्हणाले.
‘जनसंघाचं पणती चिन्ह होतं, ते जनता पक्षात गेल्यावर नांगरधारी शेतकरी चिन्ह दिलं, नंतर मग कमळ दिलं. अशा घटना मागे झाल्या आहेत,’ असा इतिहासही अजित पवार यांनी सांगितला. ‘संपूर्ण महाराष्ट्राला माहितेय, शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला आहे, पण सर्वोच्च न्यायालयाने तो अधिकार निवडणूक आयोगाला दिला. निवडणूक आयोगाने असा निकाल देऊन अनेकांना आश्चर्यचकित केलं,’ असं विधान अजित पवार यांनी केलं. भारतातील या राष्ट्रीय पक्षाने एकदोनदा नव्हे तर तीन वेळा बदललं चिन्ह; प्रत्येकवेळी ठरले हिट