16 एप्रिल : भाजपनं मुका घेतला तरी युती करणार नाही, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच शिवसेना सत्ताधारी नसून टेकूधारी पक्ष आहे असं देखील संजय राऊत म्हणाले. डोंबिवलीमध्ये एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी अनेक विषयांवर भाष्य केलंय. डोंबिवलीपेक्षा वाराणसीची अवस्था वाईट आहे असं म्हणत संजय राऊतांनी नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी या दोघांना एकाच वेळी लक्ष्य केलं. मध्यंतरी डोंबिवली हे घाणेरडं शहर आहे अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली होती. त्याला संजय राऊतांनी उत्तर दिलंय. आज संपूर्ण लक्ष वाराणसीवर आहे. वाराणसी म्हणजे देश नाही, राजीव गांधी पंतप्रधान असताना अमेठीवर लक्ष होतं. डोंबिवली पेक्षा जास्त वाईट अवस्था वाराणसीची आहे असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.