ठाणे, 16 ऑगस्ट : भाजप नगरसेवकांनी उद्यानाच्या नामकरणावरून थेट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना रोखल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे. ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावर साकारण्यात आलेल्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पाच महिन्यात दुसऱ्यांदा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे भाजप नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या उद्यानाचे पाच महिन्यांपूर्वी भाजपाचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी उद्घाटन केले होते. तेव्हा या उद्यानाला स्वर्गीय वसंत डावखरे यांचे नाव देण्यात आले होते. मात्र हे उद्घाटन अनौपचारीक होते. पण पाच महिन्यानंतर उद्यानाचे स्वर्गीय वसंत डावखरे यांचे नाव बदलून ‘वनस्थळी उद्यान’ असं नाव देण्यात आले. उद्यानाचे आज युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि आदित्य ठाकरे कार्यक्रम स्थळावरुन बाहेर पडताना ठाणे महानगरपालिकेचे भाजपचे गटनेते नारायण पवार आणि इतर नगरसेवकांनी आदित्य ठाकरे यांना रोखलं. तसंच उद्यानाचे उद्घाटन राज्यमंत्र्यांनी आधीच केले असून या उद्यानाचे नाव ‘स्वर्गीय वसंत डावखरे उद्यान’ असंच ठेवावं, असा आग्रह ठाणे महानगर पालिकेचे नगरसेवक नारायण पवार यांनी केला. अखेर प्रसार माध्यामांसमोर सेना-भाजपमधील मतभेद समोर येऊ नयेत यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली. ‘उद्यानाचे नाव वसंत डावखरेच राहिल. तसा ठराव पालिकेत मंजूर करुन घेऊ. मात्र आधी झालेले उद्घाटन अनौपचारिक होते हे उद्घाटन औपचारिक आहे, अशी समजूत एकनाथ शिंदे यांना काढावी लागली. ठाण्यात घडलेल्या या सर्व प्रकारामुळे सेना भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे असं बोलणारे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे हे बॅकफूटवर गेले आहेत. यामुळे ठाण्यात शिवसेना-भाजपमध्ये किती वाद सुरू आहेत, ते पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. भिवंडीत काळजाचा ठोका चुकवणारी रेड्यांची झुंज, पाहा हा VIDEO