मुंबई, 22 जून : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना मंत्री बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीला फोनवरून माहिती दिली आहे. मंत्री बच्चू कडू (minister Bachchu Kadu ) हे सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. शिवसेनेच्या आमदारांकडे ज्यापद्धतीनं लक्ष द्यायला हवं होतं ते दिलं जात नव्हतं, त्यामुळं आमदारांमध्ये नाराजी होतीच, असं स्पष्टपणे त्यांनी म्हटलं आहे. मंत्री बच्चू कडू यांनी अनेक गोष्टींची माहिती दिली. भाजप संपर्कात असल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. कारण, या बंडखोर आमदारांसोबत भाजपचे संजय कुटे आहेत, असे ते म्हणाले. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी निधी वाटपावरून आमदारांची मोठी नाराजी असल्याचेही सांगितले आहे. निधी कमी जास्त होण्याचा विषय असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे, अपंगाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सत्तेत होतो. हे वाचा - EXCLUSIVE : ‘शिवसेना पुन्हा संघर्षाने उभी करु’, आमदारांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्र्यांचा एल्गार
आमदारांवर कोणतेही दडपण नाही
काल ज्या बातम्या समजत होत्या की, काही आमदार दबावात आहेत किंवा काहींना मनाविरुद्ध तिथं थांबवलं गेलं आहे. मात्र, असा कोणताही प्रकार नसल्याचे कडू यांनी सांगितले आहे. येथे आलेले सर्व आमदार आपल्या मनाने आले आहेत. कोणालाही बळजबरी केलेली नाही आणि आमदारांची ही संख्या 50 पर्यंत जाऊ शकते, जास्त आमदारांचा या प्रकाराला प्रतिसाद मिळत आहे, अजून काही आमदार येण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. हे वाचा - शिवसेना आमदार उडाले भुर्रर्र…; आता गुवाहाटी ठरणार महाराष्ट्राच्या सत्ताबदलाचा पट पुढील रणनीती अजून निश्चित नाही. एकनाथ शिंदे आता कोणता निर्णय घेतात त्यावरून पुढील दिशा स्पष्ट होईल असे ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्री कडू म्हणाले होते की, विधान परिषद किंवा राज्यसभेवर सदस्य निवडून पाठवण्याच्या प्रक्रियेत अपक्षांना महत्व असतेच. अपक्ष आणि छोट्या पक्षांचा झटका काय असतो हे राज्यसभा विधानपरिषदेच्या निवडणुकीत दिसले. अपक्ष आणि छोट्या पक्षाचे आमदार म्हणतील तसेच यापुढे सरकारमध्ये होणार. त्यांच्या या वक्तव्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ते मी बोललो त्यावेळी मला या गोष्टींची जराही कल्पना नव्हती.