बाळासाहेबांसारखा कणखर आवाज, एकनाथ शिंदेंना चॅलेज देणार हा तिसरा ठाकरे?
मुंबई, 8 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षांपैकी एक असणारा शिवसेना पक्ष सध्या अडचणीत सापडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 आमदार आणि 12 खासदारांसह केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षाला प्रचंड मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेनेची झालेली ही हानी सहजासहज आणि लवकर भरून काढणारी नाहीय. विशेष म्हणजे या लढाईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकटं पडल्याचं चित्र निर्माण झालंय. कारण ठाकरे कुटुंबातील जवळपास सर्वचजणांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पण तरीही ठाकरे कुटुंबातील एक तरुण उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. या तरुणाचा आवाज शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा कणखर आहे. हा तरुण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील दसरा मेळाव्यात हजर झाला होता. त्याने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे हा तरुण पुढे राजकारणात सक्रिय झाला तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी चॅलेंज ठरु शकतो. हा तरुण नेमका कोण आहे याचबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या दोन्ही गटाच्या मेळाव्यात ठाकरे कुटुंबातील सदस्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला हजेरी लावली. त्यामुळे ठाकरे यांचं कुटुंबदेखील आपल्याच बाजून आहे, असं दर्शवण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले. पण ठाकरे कुटुंबातील कणखर आवाजाचा एक तरुण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. या तरुणाच्या वडिलांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला असला तरी या तरुणाने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे. या तरुणाचा आवाज कणखर आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा कणखर आवाज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आहे. पण त्यापुढच्या पिढीतील तरुणांमध्ये हा कणखर आवाज फारसा कुणामध्ये दिसला नाही. आदित्य ठाकरे हे हुशार राजकारणी आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हेदेखील पर्यावरणप्रेमी, संवेदनशील आणि खूप डाऊन टू अर्थ आहेत. पण या दोघांचा आवाज तितका कणखर नाहीय. ठाकरे कुटुंबातील या चौथ्या पीडितल्या एका तरुणाचा आवाज मात्र कणखर आहे. हा तरुण म्हणजे जयदीप ठाकरे! ( धनुष्यबाणासाठी रणकंदन, निवडणूक आयोगाच्या कार्यालयात वेगवान घडामोडी ) जयदीप ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात मोठे नातू. बाळासाहेब ठाकरे यांना तीन मुलं आहेत. पहिले बिंदूमाधव ठाकरे, दुसरे जयदेव ठाकरे आणि तिसरे उद्धव ठाकरे. यापैकी बिंदूमाधव यांचं दुर्दैवाने अपघाती निधन झालं आहे. त्यांना एक मुलगा आहे. त्याचं निहार असं नाव आहे. निहार ठाकरे यांनी याआधी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळ्यालादेखील त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. निहार ठाकरे यांच्यासोबत बाळासाहेबांचे दुसरे चिरंजीव जयदेव ठाकरे आणि त्यांच्या घटस्फोटीत दुसऱ्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी देखील शिंदेंच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. या मेळाव्यात जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना एकटं पाडू नका, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं. पण जयदेव आणि त्यांच्या पहिल्या पत्नी जयश्री यांचे पुत्र, बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात मोठे नातू जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. जयदीप हे कला क्षेत्रात कार्यरत आहेत. ते क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत. त्यांनी ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला लावलेल्या हजेरीमुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच आपल्या काकांनी पक्षासंबंधित कोणतीही जबाबदारी सोपवल्यास आपण आनंदाने ती जबाबदारी पार पाडू, असं जयदीप यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जयदीप यांना राजकारणात सक्रिय केलं तर एकनाथ शिंदे यांच्यापुढे जयदीप यांचं कडवं आव्हान उभं राहण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे जयदीप ठाकरे यांनी आपण यावेळी आपल्या कुटुंबासोबत उभं राहणं हे मी माझं कर्तव्य मानतो, असं मत मांडलं आहे. आजोबा, उद्धव काका आणि आदित्यबद्दल मला कायमच आदर वाटत आला आहे. मी क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहे, पण भविष्यात मला संधी मिळाली आणि उद्धव काकांना मला एखादी जबाबदारी सोपवावीशी वाटली, तर मी ती नक्कीच स्वीकारेन आणि पक्ष वाढवण्यास नक्कीच हातभार लावेन, अशी प्रतिक्रिया जयदीप यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तावाहिनीला दिली आहे. जयदीप यांच्या या प्रतिक्रियेची दखल उद्धव ठाकरेंनी घेतली तर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तिसऱ्या ठाकरेचं आव्हान उभं ठाकण्याची शक्यता आहे. कारण सध्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोन पिता-पुत्रांकडून शिंदेंवर निशाणा साधला जातोय. त्यानंतर जयदीप शिवसेनेत सक्रिय झाले तर शिंदेंच्या पुढील राजकीय आव्हानं वाढू शकतात. कारण जयदीप यांचा आवाज कणखर आहे. त्यांच्यामध्ये शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला शोधण्याचा निश्चितच प्रयत्न करतील.