मुंबई, 18 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग झालं आहे. ही पडझड रोखून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची गोळाबेरीज करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: मैदानात उतरले आहेत. शरद पवार हे सध्या राज्याच्या दौरा करत आहेत. या दौऱ्यावेळीच पवार यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांबद्दल भाष्य केलं आहे. ‘तुम्ही ताकद देऊन मोठे केलेले नेते आता पक्ष सोडून जात आहेत. याचा तुम्हाला त्रास होतो का?’ असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, ‘या नेत्यांनी पक्ष सोडल्याने मला अजितबात त्रास होत नाही किंवा वाईट वाटत नाही. उलट पक्ष सोडताना या नेत्यांनी दिलेल्या कारणांवर मला हसू येतं.’ ‘लोकांकडून मिळते उर्जा’ एकीकडे दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला असताना शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. ‘मी जर घरात असेल तर मला अस्वस्थ व्हायला होतं. पण लोकांना भेटल्यावर मला बरं वाटतं. त्यांच्याकडून मला मोठी उर्जा मिळते,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार स्वत: मैदानात, राज्याचा दौरा करून पुन्हा गोळाबेरीज? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या महाजनादेश यात्रेच्या माध्यामातून पुन्हा एकदा भाजपला सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजपच्या या रणनीतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गळतीच्या पार्श्वभूमीवर पवारांचा राज्याचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. काय आहे राष्ट्रवादीचा प्लॅन पलटवार? लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला चितपट करून लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे. मात्र सतत होणाऱ्या आऊटगोईंगमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी चिंतेत आहे. हीच चिंता दूर करण्यासाठी राष्ट्रवादीने नवी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय डावपेचांची अनेकदा चर्चा होते. पण आता पवारांना पुन्हा शह देण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि काही नेते गळाला लावले आहेत. त्यामुळे पक्ष सोडलेल्या नेत्यांना दणका देण्यासाठी पवारांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. VIDEO ‘इलाका हमारा धमाका भी हमारा’ आदित्य ठाकरेंचं ठाकूरांना थेट आव्हान