JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / संजय राऊतांनी सांगितली राहुल गांधींच्या मनातली 'ती' खंत, केलं प्रियंका गांधींचं कौतुक

संजय राऊतांनी सांगितली राहुल गांधींच्या मनातली 'ती' खंत, केलं प्रियंका गांधींचं कौतुक

आजच्या सामनामधील रोखठोक या सदरामधून संजय राऊत यांनी भाजपावर परखड शब्दांत टीका केली आहे. प्रियांका गांधींची तुलना इंदिरा गांधींशी केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 ऑक्टोबर: उत्तर प्रदेश लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) प्रकरणामुळे सध्या देशातलं राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेचा विरोधी पक्षांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याच प्रकरणावरुन शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या रोखठोक सदरातून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. आजच्या सामनामधील रोखठोक या सदरामधून संजय राऊत यांनी भाजपावर परखड शब्दांत टीका केली आहे. तसंच या सदरातून संजय राऊत यांनी प्रियांका गांधींची तुलना इंदिरा गांधींशी केली आहे. जाणून घेऊया आजच्या रोखठोक सदरातून ठळक मुद्दे प्रियांका गांधींमध्ये थेट भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक दिसते, असं संजय राऊत यांनी आजच्या रोखठोकमध्ये म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारले. ईडी, सीबीआयसारख्या तपासयंत्रणा आज कुणालाही अटका करीत आहेत. पण चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला आहे. त्याची झोप उडवण्याचं काम प्रियांका गांधी यांनी केलं. इंदिराजींचं अस्तित्व यानिमित्ताने पुन्हा दिसलं. लखीमपूर खेरी येथे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी भेटण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवलं. धक्काबुक्की केली. बेकायदेशीररीत्या डांबून ठेवलं. इंदिरा गांधींच्या नातीला, राजीव गांधींच्या कन्येला भररात्री पोलिसांशी संघर्ष करताना देशानं पाहिलं. प्रियांका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला, त्यांना इंदिरा गांधींचं देशात अस्तित्व आहे आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल. हेही वाचा-  सोडून दिलेल्या 6 जणांमध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार होते?, NCBनं म्हटलं… प्रियांका गांधींना सीतापूरला जबरदस्ती डांबले. त्या घाणेरड्या जागेत झाडू हातात घेऊन प्रियांका यांनी साफसफाई केली. देशात स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने एक दिवस ज्यांनी झाडू घेऊन फोटो काढले, त्या लाखो फोटोंवर प्रियांका गांधींच्या एका झाडूने मात केली. हाथरसपासून लखीमपूर खेरीपर्यंत राहुल आणि प्रियांका त्याच पद्धतीने वागल्या. प्रियांका गांधी इंदिराजींची प्रतिकृती आहेत की नाही हे येणारा काळच ठरवेल. त्या काळाची सुरुवात झाली आहे हे सीतापूरच्या रस्त्यावर प्रियांका यांनी दाखवले. इंदिरा गांधी आणि त्यांची काँग्रेस नको म्हणून १९७७ साली विरोधक एकत्र आले आणि सत्ताधारी काँग्रेसचा पराभव केला. आज सत्तेवर नसलेल्या काँग्रेसचेही इतर विरोधकांना वावडे व्हावे याचे आश्चर्य वाटते. मंगळवारी दुपारी संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट झाली. भेटीत राहुल गांधी यांनी भाजपशी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. पण मनातली एक खंतही बोलून दाखवली. हेही वाचा-  पुण्यातील पावसाचा फटका थेट पालकमंत्री अजितदादांनाच ! आप आणि तृणमूल काँग्रेस मतांचं विभाजन घडवून भाजपचाच फायदा करून देत आहेत. गोव्यात काही संबंध नसता तृणमूल आणि आप आली आणि त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले. पैशांचा वापर त्यासाठी सगळेच करतात ही खंत गांधींनी बोलून दाखवल्याचं राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे. तृणमूल व आम आदमी पक्ष काँग्रेसला गिळत आहे. त्यांनी भाजपचे निदान शेपूट तरी तोडावे. काँग्रेस कमजोर करणे व त्यातून स्वतः वाढणे हे शेवटी भारतीय जनता पक्षालाच सोयीचे ठरते, असंही रोखठोकमध्ये राऊतांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच राजकारणी हातचे राखून लढायला उतरले आहेत. प्रत्येकाचे हात कुठेतरी दगडाखाली अडकले आहेत. त्यामुळे ‘खुलकर’ कोणीच लढत नाही. गांधी यांचा रोख बहुधा मायावतींवर असावा. उत्तर प्रदेशसारखे मोठे राज्य जाती-धर्मात विभागले आहे. त्यामुळेच भाजपचा फायदा होतो, पण एक वेळ अशी येईल काँग्रेसच भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधी हे म्हणाले, तो दिवस लवकर उजाडो हीच अपेक्षा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या