बारामती, 03 नोव्हेंबर : राज्यात यंदाचा 15 ऑक्टोबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान राज्यातील साखर कारखानदारांनी एफआरपी दोन तुकड्यात देण्याचा निर्णय घेतला. यावरून राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होणार असल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. यासाठी 7 नोव्हेंबरला साखर संकुलावर मोर्चाचे नियोजन केले आहे. तसेच ते काल(दि.02) इंदापूर येथे बोलत होते. यावेळी त्यानी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली.
इंदापूर तालुक्यात ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, 7 नोव्हेंबरला पुणे येथील साखर संकुलावर राज्यातील कारखानदारांच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चा बारामती तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले. याचबरोबर यंदाच्या गळीत हंगामात एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा घाट कारखानदार करत आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे असे शेट्टी म्हणाले.
हे ही वाचा : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा, सरकारने जाहीर केली मदत
याचबरोबर गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला एफआरपी पेक्षा 200 रुपये दर मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. जर पैसे दिले नाहीत तर 17 आणि 18 तारखेला ऊसतोड बंद करणार असल्याचा इशाराही शेट्टी यांनी दिला. तसेच यावर्षी 350 रुपये एफआरपी पेक्षा जास्त कारखानदारांनी दिले पाहिजे. इथेनॉलला 63 रुपये मिळायचे आता 65 रुपये दर मिळतो आहे. यामुळे कारखानदारांना याचा फायदा आहे. जर कारखानदारांना फायदा होत असेल तर शेतकऱ्यांनाही याचा फायदा झाला पाहिजे असे शेट्टी म्हणाले.
साखर कारखानदारांनी महाराष्ट्रातील कारखान्यावरील काटा मारी बंद करावी. कारखान्यात डिजिटल काटा बसवावा. सहकारी साखर कारखान्यात काटा मारण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु खाजगी कारखाने सर्रास काटे मारतात यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
शरद पवार यांच्यावर जोरदार टीका
मुलगा पेपर लिहिणार आणि बाप पेपर तपासणार तसेच पोरगा कारखाना चालवणार आणि बाप त्याचे पर्यवेक्षण करणार ते परिवेक्षण कसं नीट होईल. असे म्हणत शेट्टींनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. ते पुढे म्हणाले की, यांच्या घरात लाखो टन उस गाळप होतो आणि हेच वसंतदादा शुगर संस्थेचे अध्यक्ष आहेत.
हे ही वाचा : हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? ‘कडू’ वादावरून शिवसेनेनं रवी राणांना डिवचलं
यामुळे कारखाने विशिष्ट लोकांच्या हातात जायला लागले आहेत. यातूनच मक्तेदारी पद्धत वाढल्याने शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सध्या सुरू आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर एकदा मोर्चा काढायला पाहिजे. त्यांना विचारले पाहिजे काय संशोधन केले आहे. एफआरपी ठरवताना इथेनॉलचे उत्पादन लक्षात घेण्याची गरज असल्याचे शेट्टी म्हणाले.