'एकदम कोरोना संपला आहे अशा भूमिकेतून काम करणे चालणार नाही, कारण याचे मोठे परिणाम आपण पहिले आहेत'
औरंगाबाद, 1 जानेवारी : महाराष्ट्रात कोरोनाबाधित (Maharashtra Corona) रुग्णांची संख्या पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात वाढायला लागली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) राज्यात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लागू करु शकतं, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये जोर धरु लागली आहे. पण या चर्चेदरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यात लॉकडाऊन लागू करण्याबाबत कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. याशिवाय लॉकडाऊन लागू केला तर त्याचा सर्वात मोठा फटका हा हातावर पोट भरणाऱ्या गरीब नागरिकांना बसेल. त्यामुळे निर्बंध जितके कडक करता येतील तितके करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नाही. कारण याआधीच्या पहिल्या-दुसऱ्या लॉकडाऊनचे चटके सर्वसामान्यांनी सोसले आहेत, असं राजेश टोपे म्हणाले. लॉकडाऊनचा परिणाम थेट अर्थकारणावर “लॉकडाऊनचा परिणाम थेट अर्थकारणावर होतो. गरीब माणूस हा हातावर पोट भरतो. त्याच्यावर लॉकडाऊनचा थेट परिणाम होतो. लोकांनी पहिल्या-दुसऱ्या लॉकडाऊनचे चटके आणि झळ सोसली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठक झाली. पंतप्रधानांनीदेखील जान है तो जहाँ है, असं सांगितलंय. मुख्यमंत्री देखील याच विचारांचे आहेत. आपल्याला लोकांची काळजी अधिक घ्यायची आहे. त्यामुळे अशाप्रकारचे कठोर निर्णय घ्यावे लागले तर होय घ्यायचे आहेत. निर्बंध हा देखील त्यातील महत्त्वाचा भाग आहे”, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली. हेही वाचा : कोरोना रुग्णांची संख्या वाढली, मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागणार का? पालकमंत्री म्हणतात…. ‘निर्बंधांतून नियंत्रणात आलं तर ठिकच, नाहीतर…’ निर्बंध हे पहिलं पाऊल आहे. त्या अनुषंगाने आपल्याला बघायचं आहे. निर्बंधच्या अनुषंगाने आपण लोकांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेत आहोत. या निर्बंधाचे परिणाम लगेच दिसणार नाहीत. थोडावेळ लागतो. पण निर्बंधांच्या बाबतीत नक्कीच कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने काम करत आहोत. यावरुन नियंत्रणात आलं तर ठिकच आहे. नाही आलं तर रेस्टॉरंट, सिनेमाहॉल, मॉल, शाळा-कॉलेज, हॉटेलबाबत निर्णय घ्यावा लागेल. याशिवाय लसीकरणासाठी मोहीम राबवायची आहे", असं राजेश टोपे म्हणाले. हेही वाचा : राज्यात 10 मंत्री आणि 20 आमदारांना Corona; लग्नसोहळे अन् राजकीय नेते ठरतायत सुपर स्प्रेडर ’…त्यावेळी ऑटोमोडमध्ये लॉकडाऊन लागेल’ “लॉकडाऊन जरी कुणी म्हणत असेल तरीसुद्धा लॉकडाऊनचा अर्थ आताच लागू करण्याबाबत नाही. लॉकडाऊनचा विषय सध्या अजिबात नाही. त्यामुळे माध्यमांनीहीदेखील लॉकडाऊनची भीती घालू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आरोग्य विभाग टास्क फोर्ससोबत दोन तासांच्या झालेल्या प्रदीर्घ बैठकीत कुठेही लॉकडाऊनची चर्चा नाही. निर्बंध जरुर वाढवले पाहिजेत. लॉकडाऊनची भाषा आम्ही त्याचवेळेस करु जेव्हा 700 मेट्रिक टन ऑक्सिजनचं कन्सप्शन होईल. त्यादिवशी ऑटोमोडमध्ये लॉकडाऊन होऊन जाईल, अशा पद्धतीने ठरविण्यात येईल. त्यामुळे आज लॉकडाऊनबाबत चर्चा झालेली नाही. संख्या वाढतेय हे निश्चितच आहे”, असं राजेश टोपे स्पष्टपणे म्हणाले.