मुंबई, 14 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. 13 ऑगस्ट, शनिवारपासूनच राज्यात ठिकाठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यातही मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक या महामार्गावर काही किलोमीटर प्रवास करण्यासाठीही नागरिकांना तासन् तास वाट पाहावी लागत आहे. सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर इतकी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे की, लांबच्या लांब रांगा पाहायला मिळत आहे. नागरिक या वाहतुकीच्या खोळंब्यामुळे सोशल मीडियावरुन आपला राग व्यक्त करीत आहेत. इतकच काय तर पुण्याहून मुंबईला यायला तब्बल 7 ते 8 तास लागत असल्याचंही समोर आलं आहे. Video : मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; 5 ते 6 किमी लांब रांगाच रांगा त्यातही कल्याणमार्गे बदलापूर, अंबरनाथ येथे येणाऱ्यांना शिळफाट्याजवळ नेहमीप्रमाणे अनेक तास वाट पाहावी लागत आहे.
याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आले आहे. फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्यांचा अधिकतर वेळ हा वाहतूक कोंडीमध्येच जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
केवळ पुणे ते मुंबईच नाही तर नाशिकहून मुंबईला येतानादेखील हेच चित्र होतं. राखीपौर्णिमेपासून ही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मुंबई - नाशिक महामार्गावरील माणकोली ते माजिवाडा दरम्यान मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. राखीपौर्णिमा असल्याने रक्षाबंधनासाठी जाणारे भाऊ या वाहतूक कोंडीत अडकले होते.